आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील चैत्र यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केले. दि. ५ मेरोजी होणाऱ्या सासणकाठी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात आयोजित आढावा बैठकीत ते आज (दि.१८) बोलत होते. (Kharsundi Chaitra Yatra)
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
तहसीलदार सागर ढवळे यांनी मंदिर परिसरात आणि पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले. यात्रेशी संबंधित आरोग्य, वीज, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, देवस्थान, परिवहन महामंडळ, बाजार समिती, पोलीस व महसूल विभागांनी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या तयारीचा आढावा घेऊन जबाबदारी निश्चित केली.
यावेळी मंदिरातील दर्शन व्यवस्था, पार्किंग, सीसीटीव्ही, पर्यायी रस्ते याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस महावितरणचे सहाय्यक अभियंता विष्णू मंडले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक कोळेकर, आगार व्यवस्थापक राहुल देशमुख, डॉ. पी.व्ही. मिसाळ, कनिष्ठ अभियंता अण्णासो बुरुंगले व बी. एस. जोजन, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड, एस.यु. जाधव, देवस्थान समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य मंडल अधिकारी के.बी.मुलाणी, तलाठी के. एस .मुंडे, पोलीस पाटील बापूराव इंगवले, ग्रामसेवक सोमनाथ शिंत्रे, सुरेश इंडीयनचे दत्तात्रय चव्हाण आदी उपस्थित होते.
या बैठकीत मानकरी यांच्या उपस्थितीत आणि विविध खात्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन बैठका आयोजित केल्याचे तहसीलदार ढवळे यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी यात्रेतील वाहतूक व पालखी मिरवणूक याबाबत उपयुक्त सूचना करून यात्रेसाठी सहकार्य करण्याचे अवाहन केले. सरपंच धोंडीराम इंगवले यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे यांनी आभार मानले.
चैत्र यात्रेच्या निमित्ताने भरणाऱ्या खिलार जनावरांच्या बाजार तळाबाबत बैठकीत चर्चा झाली. बाजार समितीने भिवघाट रस्त्याकडील तळाला तर ग्रामपंचायत प्रशासनाने झरे रस्त्याकडील तळावर बाजार भरविण्याबाबत आग्रह धरला. यावर तहसीलदार सागर ढवळे यांनी अधिकृत बाजारतळ प्रशासनाकडून जाहीर होईपर्यंत यात्रा गत वर्षीप्रमाणे झरे रस्त्यावरील बाजार तळावर भरवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आठ दिवस आधी बैठक होत असे. पण यावेळी तहसीलदार सागर ढवळे यांनी यात्रेपूर्वी तीन आठवड्यापूर्वी बैठक घेतली. सर्व विभागांना तत्काळ उपाययोजना आणि कामाला लागण्याचे आदेश दिले. यात्रेपूर्वी आणखी दोन बैठका होणार आहेत. त्यामुळे यात्रा सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.