सांगली : जलजीवन मिशनमधून केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील या ठेकेदाराने जुलैमध्ये जीवन संपवले. दोन-तीन दिवस राज्यभर गदारोळ झाला. शासनाविरोधात ठेकेदार, सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले. नेत्यांनी कोरडे आश्वासन दिले. मात्र आजअखेर शासनाकडून एकही रुपया आला नाही. ‘जलजीवन’च्या कामातील ठेकेदारांची सुमारे 40 कोटी रुपयांची बिले सहा महिन्यांपासून थकीत आहेत. त्यामुळे शासन आणखी कोणाच्या आत्महत्येची वाट बघत आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी ‘अळी-मिळी’ची भूमिका घेतल्याने तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
बिले दिली नसल्याने बहुसंख्य ठेकेदारांनी कामे थांबवली आहेत. प्रशासनाकडे ठेकेदार बिलाची विचारणा सातत्याने करीत आहेत. मात्र शासनाकडून निधीच आला नसल्याने आम्ही काय करू, अशी उत्तरे मिळत आहेत. तांदूळवाडी येथील एका ठेकेदाराच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर ‘आमचा तो ठेकेदारच नाही’, ‘प्रशासन त्याचे देणे लागत नाही’, असे अगदी सहज बोलून स्थानिक अधिकार्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच हात वर केले. जरी त्यांना कागदोपत्री काम मिळाले नसले तरी ते काम पूर्ण कोणी केले, हे अगदी जगजाहीर होते.
हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची आमदार, खासदार, मंत्र्यांनी भेट घेऊन सांत्वन केले. मात्र घटनेला दोन महिने उलटूनदेखील एकही रुपयाचे बिल मिळाले नाही. प्रशासन असो अथवा शासन, लोकप्रतिनिधी कोणीच याबाबत काहीच बोलण्यास तयार नाही. त्यामुळे ठेकेदारांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. बिले मिळण्यासाठी आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.