जत शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी 
सांगली

Sangli News : जत शहरात सातत्याने वाहतुकीची कोंडी

तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठकीची गरज

पुढारी वृत्तसेवा

जत शहर : जत शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी राहत आहे. या समस्येवर तोडगा निघावा, यासाठी नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी होत आहे.

शहरात शहीद अंकुश सोलनकर चौक, सनमडीकर हॉस्पिटल, डॉ. आरळी कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक परिसर, मार्केट यार्ड, बनाळी कॉर्नर, पेठेतील मारुती चौक, उमराणी कॉर्नर, तेली गल्ली, स्टेट बँक परिसर, वाचनालय चौक अशा प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठेतील रस्ते मुळातच अरुंद आहेत. त्यावर भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते व हातगाडीवाले रस्त्याच्या कडेला थांबून व्यवसाय करत असल्याने रस्त्याची रुंदी आणखी कमी होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणारे चालक, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविण्याचे प्रमाणही वाढले आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष जाणे अत्यावश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी तातडीने एक संयुक्त बैठक घेऊन शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी जतकरांकडून होत आहे. या बैठकीत भाजीपाला विक्रेते प्रतिनिधी, काळी-पिवळी वडाप चालक, व्यापारी प्रतिनिधी, हातगाडीवाले सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सहभागी करून घेतल्यास वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना होऊ शकेल, असा नागरिकांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT