सांगली

सांगली जिल्ह्यात सर्वत्र संततधार

Arun Patil

सांगली, पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने पुढचे दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आणि सांगली जिल्ह्यातही सर्वत्र रविवारी संततधार पाऊस झाला. सकाळपासून रात्रीपर्यंत पाऊस कोसळत होता. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. चांदोली धरणातून 9500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिराळा तालुक्यात वारणा पाणलोट क्षेत्रात निवळे येेथे 138 मि.मी. तर धनगरवाडा येथे 161 मि.मी. पावसाची नोंद झाली. या दोन ठिकाणी ढगफुटी सद़ृश्य पाऊस पडला.

विसर्ग सुरू; सतर्कतेचा इशारा

वारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 11 मिलिमीटर पावसासह आजअखेर 1752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी पातळी वाढू लागली आहे. परिणामी, आज दुपारी साडेतीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 1500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर 2900 क्युसेक विसर्गात वाढ करून धरणाच्या वक्रद्वारा मधून 5000 क्युसेक व विद्युत जनित्र मधून 1400 असा एकूण 6400 क्युसेक विसर्ग सायंकाळी 5 वाजता सोडण्यात आला. रात्री तो 9500 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात आणखी वाढ करण्यात येणार असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वाळवा तालुक्यात संततधार

इस्लामपूर : गेल्या दोन दिवसांपासून वाळवा तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. हा पाऊस खरीप पिकासाठी पोषक आहे. उघडिपीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्रीपासून इस्लामपूरसह आष्टा, ऐतवडे खुर्द, शेखरवाडी, चिकुर्डे, कुरळप, रेठरेधरण, वाटेगाव, तांबवे, कासेगाव, कामेरी, नेर्ले, बोरगाव, बहे, किल्लेमच्छिंद्रगड आदी परिसरात पावसाची संततधार सुरु आहे.

पलूस तालुक्यात जोरदार

पलूस : संपूर्ण पलूस तालुक्यात रविवारी पहाटे 5 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पलूस शहरात पाणीच पाणी साचले. तालुक्यातील विजपुरवठा अधून मधून बंद केला जात होता. पलूससह भिलवडी अंकलखोप नागठाणे, दुधोंडी, कुंडल आमणापूर परिसरात मुसळधार पाऊस झाला.

भात पिके जमीनदोस्त

मांगले  जोरदार वारा आणि सततच्या पावसाच्या मार्‍यामुळे मांगले परिसरातील भरलेली भातपिके जमीनदोस्त झाली आहेत. आगाप पेरणी केलेल्या काही शेतातील भात पिकांची काढणी खोळंबली आहे.

खानापूर तालुक्यात वातावरण बदलले

विटा : खानापूर आणि विटा शहरासह गार्डी, घानवड,नागेवाडी,साळशिंगे, वेजेगाव,भांबर्डे, कार्वे,पारे,रेणावी, रेवणगाव आधी गावांमध्ये दुपारी साडेबारा वाजल्या पासून संततधार पाऊस पडला. यामुळे रस्त्या वर आणि शेतात पाणी पाणी झाले आहे. हा पाऊस तालुक्यातील दुष्काळ सदृश परिस्थि ती दूर करायला उपयुक्त ठरणारा आहे.

बागायतदारांच्या डोक्याला ताप

खरीप हातातून गेलेला असला तरी या सलग पडणार्‍या पावसाने रब्बी हंगामाची शाश्वती दिली आहे. हा पाऊस भात, सोयाबीन, भुईमूग, मका, खरीप ज्वारी आदी पिकांना पोषक असला तरी भरलेली भातपिके जमीनदोस्त झाली आहेत. काढणी खोळंबली आहे. भाजीपाला उत्पादक आणि द्राक्षबागायतदारांच्या डोक्याला या पावसाने ताप दिला आहे. पावसाने पिकांवर रोग पडण्याची भिती आहेच, शिवाय ऑक्टोबर महिन्यातील छाटणी तोंडावर आली असताना द्राक्षबागेतही पाणी साचून चिखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT