व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाचा संभ्रम Pudhari Photo
सांगली

व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशाचा संभ्रम

करण शिंदे

सांगली : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य आयुष अभ्यासक्रमांसाठीच्या दुसर्‍या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही व्यवस्थापन कोट्याच्या फीविषयी अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश रेंगाळले आहेत. शुल्क नियामक प्राधिकरणाकडे तक्रारींचा पाऊस पडूनही त्यावर निर्णय होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आयुष अभ्यासक्रमासाठी दुसर्‍या फेरीअंतर्गत प्राधान्यक्रम भरण्याची सुरुवात सोमवारी झाली. 2 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरता येणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी दुसर्‍या फेरीची निवड यादी प्रसिद्ध होणार असून विद्यार्थ्यांना 5 ते 9 ऑक्टोबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, व्यवस्थापन कोट्यासाठीच्या फीचा निर्णय शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाने अद्याप न घेतल्याने फीविषयी अनिश्चितता कायम आहे. गतवर्षीपर्यंत व्यवस्थापन कोट्याची फी तीनपट होती. मात्र, शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने 13 सप्टेंबर रोजी शिक्षण शुल्क नियामक मंडळास पत्र पाठवून पाचपट फी घेण्याविषयी हरकत नसल्याचे कळवले. या पत्राचा आधार घेऊन अनेक आयुष महाविद्यालयानी पाचपट फीची मागणी केल्याने विद्यार्थ्यांना आयुर्वेद अभ्यासक्रमांसाठी 50 ते 60 लाख रुपये आणि होमिओपॅथी कोर्सेससाठी 20 ते 35 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. दुसर्‍या फेरीअखेर आयुर्वेदच्या व्यवस्थापन कोट्याच्या 835 आणि होमिओपॅथीच्या व्यवस्थापन कोट्याच्या 428 जागा अजून रिकाम्या आहेत.

प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयांचे नियमित शुल्क आणि व्यवस्थापन कोट्याचे शुल्क निश्चित होणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार महाविद्यालयांची निवड करता येईल. दरवर्षीचा हा गोंधळ संपवणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
- डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली.
महाराष्ट्रातील महाविद्यालयांनी फीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. मध्यमवर्गीय पालकांनी मोठ्या प्रमाणात पैसे भरून प्रवेश घेणे शक्य नाही. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा कर्नाटककडे ओढा वाढला आहे.
-सचिन पाटील, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सल्लागार, सांगली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT