सांगली : महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा वेळेत करावा, त्यांनी पावती व स्वयंघोषणापत्र दि. 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावे, अन्यथा त्यांचा पगार काढला जाणार नये, असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.
महानगरपालिकेच्या दैनंदिन कारभारासाठी तसेच रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा आदी नागरी सुविधांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी हे महसुलाचे प्रमुख स्रोत आहेत. त्यामुळे करांचा नियमित व पूर्ण भरणा होणे आर्थिक शिस्तीच्यादृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेवरील करांची थकबाकी नसल्याचे प्रमाणित निवेदन सादर करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
कर भरणा केल्याची पावती व स्वयंघोषणापत्र सादर केल्यानंतरच महापालिकेच्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. मुदतीत ही कागदपत्रे सादर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. स्वयंघोषणापत्रामध्ये संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या, कुटुंबीयांच्या तसेच भाडेतत्त्वावर वास्तव्यास असलेल्या मालमत्तेबाबत घरपट्टी व पाणीपट्टी पूर्ण भरलेली असून कोणतीही थकबाकी नसल्याचे नमूद करणे आवश्यक आहे.