सांगली : मी बारावीला होतो, तेव्हाच 2021 मध्ये आयएएस होणार, असा निर्धार केला होता. तासा-तासाचा हिशेब ठेवत मी अभ्यास केला. विरोध झुगारून आवडीच्या कला शाखेचे विषय घेतले. आई-वडिलांनी कर्ज काढून मला शिकवले आणि वयाच्या 25 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालो. शिस्त, नियमितपणा आणि कठोर परिश्रमाला पर्याय नाही, पण हे केले तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही, असा कानमंत्र सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’ प्रदर्शनाचे.
दहावी-बारावीनंतर करिअरची योग्य दिशा दाखविण्यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या ‘दै. पुढारी एज्यु. दिशा’ या बहुप्रतीक्षित शैक्षणिक प्रदर्शनाचा प्रारंभ काल, शुक्रवारी आयुक्त गांधी यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. सांगलीत राम मंदिर चौकातील कच्छी जैन भवनमध्ये कालपासून हे भव्य प्रदर्शन सुरू झाले. 8 जूनपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. आयुक्त गांधी यांनी पालकांना महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले, तुमच्या मुलाला त्याच्या आवडीच्या विषयातच करिअर करूद्या. त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही आज केलेली गुंतवणूक उद्या परतावा देणारी आहे. मुलं स्वावलंबी होऊन तुमचा सन्मान वाढवतील, हे नक्की. मुलांनीही पुढच्या पाच वर्षांत आपण कोठे असावे, याचे चित्र आताच ठरवले पाहिजे.
संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट ट्रस्टी विनायक भोसले यांनी, पालकांनी आज पाल्याच्या शिक्षणासाठी केलेल्या योग्य गुंतवणुकीची व्याजासह परतफेड नक्की होईल, अशी खात्री व्यक्त केली. मुलाला आवडेल त्यातच त्याला करिअर करूद्या. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअरच होण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. ‘दैनिक पुढारी’च्यावतीने आयोजित करण्यात येणारे हे प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनीही, आवड बघूनच अभ्यासक्रम निवडण्याचे आवाहन केले व प्रत्येक अभ्यासक्रम महत्त्वाचाच असल्याचे सांगितले.
सांगली येथील या शैक्षणिक प्रदर्शनास संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक आहेत, तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे हे लाभले आहेत. एम. आय. टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी आणि भारती विद्यापीठ, पुणे हे प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक आहेत. पीसीईटीज् पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम.आय.टी. ए.डी.टी. युनिव्हर्सिटी, पुणे, डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगली तसेच चाटे शिक्षण समूह हे सहप्रायोजक आहेत. या प्रदर्शनात राज्यभरातील नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या आहेत. करिअर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ आणि नवे करिअरचे पर्याय एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, त्यांची गोंधळलेली अवस्था दूर व्हावी आणि पालकांना निश्चितता लाभावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
उद्घाटनप्रसंगी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे प्रा. राहुल माटेे, भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सांगलीच्या संचालिका डॉ. पल्लवी जामसांडेकर, एम.आय.टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, सोलापूरचे अॅडमिशन अँड आऊटरीच हेड अनुप सिंग, जिल्हा समन्वयक चाटे शिक्षण समूहाचे मुजावर सादिक, चाटे शिक्षण समूहाचे अॅडमिनिस्ट्रेशन हेड प्रवीण पवार, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सहायक प्राध्यापिका प्रा. अस्मिता जोशी, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटीचे सि. सहा. प्राध्यापक डॉ. युधिष्ठीर राऊत, एम.आय.टी. - एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेचे (सायबर सुरक्षा विभाग) सहायक प्राध्यापक प्रा. अमन कांबळे, डेक्कन इन्स्टिट्यूट, सांगलीचे संस्थापक व संचालक डॉ. नीलेश शिवाजी खराडे उपस्थित होते.
आभार पुढारी पब्लिकेशन प्रा. लि.,चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर यांनी मानले. यावेळी सांगली शाखा व्यवस्थापक युवराज पानारी, निवासी संपादक सुरेश गुदले, सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर, जाहिरात व्यवस्थापक प्रशांत कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते. निवेदन आर.जे. शरद यांनी केले.
आठ-दहा तास नियमितपणे अभ्यास करा. चार तास आवडीच्या गोष्टींना द्या. आजच्या मुलांचा 30 टक्के वेळ इन्स्टाग्राम, रिल्समध्ये जातो. याला मर्यादा घाला. रोज रात्री झोपण्यापूर्वी एका कागदावर प्रत्येक तासाचा हिशेब लिहा. वेळ वाया घालवू नका. शिस्त-नियमितपणा, ठोर परिश्रम कराल तर स्वावलंबी व्हाल आणि मगच आयुष्य स्थिर होईल.सत्यम गांधी, आयुक्त