सांगली

सांगली-कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती सुरू

अविनाश सुतार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :गेल्या अनेक वर्षांपासून समस्येच्या गर्तेत सापडलेला सांगली-कोल्हापूर मार्ग खड्ड्यांच्या विळखात सापडून मृत्यूचा सापळा बनला होता. यात अनेकांचे बळी गेले आहेत. दै.'पुढारी'ने सातत्याने यावर आवाज उठवून प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे. अखेर गेल्या दोन दिवसांपासून सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळेे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्ग काही केल्यास अडथळ्यांतून बाहेर पडताना दिसत नाही. पूर्वीची कंपनी काम अर्धवट सोडून न्यायालयात गेल्याने महामार्गाचे काम रखडले होते. कराड येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग रत्नागिरी-नागपूर महामार्गात विलीनीकरणाचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, ऑगस्ट 2019 व जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरात शिरोली, हालोंडी व कोल्हापूर पंचगंगा पुलाजवळ महामार्ग पाण्याखाली गेल्याने बांधकाम प्रशासनाला पुन्हा नव्याने विचार करावा लागला आहे.

सध्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अंकली (ता. मिरज) पर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार महापुरातही रस्ते पाण्याखाली जाणार नाहीत, यासाठी किमान दोन मार्गांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. यात उदगाव ते शिरोलीहून शिये-भुयेमार्गे केर्लीहून रत्नागिरी मार्गाकडे, दुसरा मार्ग उदगाव ते बोरपाडळे असा नव्याने सर्व्हे करण्यात आला आहे. हा मार्ग उदगाव, उमळवाड, दानोळी, कुंभोज, नरंदे, मिणचे, सावर्डे, पेठवडगाव, वाठार, तळसंदे, नवे पारगाव, वारणानगर, कोडोली ते बोरपाडळेचा असून, महापुरातही रस्ता पाण्याखाली जाणार नाही, अशा उंचीचे रस्ते करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT