सांगली ः मैत्रिणींसह दंडोबा डोंगरावर सहलीला निघालेल्या महाविद्यालयीन युवतीवर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास काळाने घाला घातला. सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर जय मातृभूमी मंडळाजवळ एसटीच्या चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला. शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय 21, रा. कबाडे हॉस्पिटलमागे, भारतनगर, कोल्हापूर रोड, सांगली) असे मृत युवतीचे नाव आहे. याबाबत सोनाली राजकुमार कुलकर्णी (वय 26) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बसचालक नितीन श्रीरंग शिंदे (रा. खंडोबाचीवाडी, पोस्ट गोवे, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शर्वरी ही मूळची जत येथील असून ती आई व बहिणीसह कोल्हापूर रस्त्यावरील भारतनगरमध्ये राहत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती शहरातील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. गुरुवारी महाविद्यालयातील मैत्रिणींनी एकत्रित दंडोबा डोंगरावर सहलीचे नियोजन केले होते. सार्या मैत्रिणी मिरजेत एकत्र येऊन दंडोबाला जाणार होत्या. त्यासाठी ती सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरुन (एमएच 10 सीजे 2457) घरातून निघाली होती. डॉ. आंबेडकर रस्त्याने शासकीय रुग्णालय चौकाच्या दिशेने येत होती. याचवेळी जमखंडीहून मुंबईकडे बस (एमएच 14 एलएक्स 5928) जात होती. जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर ती आली असता बस चालकाने तिच्या दुचाकीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वेगात असलेल्या बसची शर्वरीच्या दुचाकीस धडक बसली. यामुळे ती रस्त्यावर पडून एसटीच्या मागील चाकाखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान रस्त्यावरुन जाणार्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने काही अंतरावर जावून चालकाने बस थांबविली आणि घटनास्थळावरुन पलायन केले.
नागरिकांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यास अपघाताची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून तिला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शर्वरीची आई, बहीण व नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तिच्या मृत्यूचे वृत्त कळताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. वडिलांच्या निधनानंतर मुलीचाही मृत्यू झाल्याने कुलकर्णी कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. सायंकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी अपघातग्रस्त बस व दुचाकी ताब्यात घेतली. बसचालक नितीन शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महाविद्यालयीतील मैत्रिणींनी एकत्रित दंडोबा डोंगरावर सहलीने नियोजन केले होते. त्या सहलीसाठी शर्वरीने बुधवारीच बहिणीसोबत बाजारात जाऊन नवीन कपडे, चप्पल खरेदी केले होते. रात्री बहिणीने ‘दुचाकी घेऊन जाऊ नकोस’, असेही सांगितले होते. सकाळी शर्वरी पुन्हा ‘दुचाकी घेऊन जाणार’ असा आग्रह करू लागली. बहिणीने तिला अडविले. पण शेवटी ती दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. यानंतर काही वेळात तिच्या मृत्यूची बातमीच कुटुंबीयांना कळाली. तिच्या मृत्यूने आई व बहिणीला मोठा धक्का बसला आहे.
सकाळी वर्दळीच्यावेळी डॉ. आंबेडकर रस्त्यावर अपघात झाल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. सिव्हिल चौक ते झुलेलाल चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.