भर रस्त्यात टेम्पोतील सिलिंडरला गळती 
सांगली

सीएनजी गळतीने इस्लामपुरात थरकाप

भर रस्त्यात टेम्पोतील सिलिंडरला गळती; नागरिकांची धावाधाव

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : येथील इस्लामपूर - सांगली रस्त्यावर बसस्थानक परिसरात सीएनजी सिलिंडरची वाहतूक करणार्‍या टेम्पोतील सिलिंडरमधून सीएनजी गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने नागरिकांची धावाधाव झाली. भीतीने परिसरातील व्यावसायिकांनी दुकाने बंद करून धूम ठोकली. 20 मिनिटे हा थरार सुरू होता.

सीएनजीची सिलिंडर्स घेऊन टेम्पो वाघवाडीहून कवठेमहांकाळकडे निघाला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टेम्पो बसस्थानक परिसरात आला. त्यावेळी टेम्पोतील खालील बाजूतील पहिल्या ओळीतील मोठ्या सिलिंडरमधील व्हॉल्व्हला गळती लागली. त्यातून मोठा आवाज येऊ लागला. सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागल्याने टेम्पोशेजारील दुकाने, हातगाडे बंद करून व्यावसायिक टेम्पोपासून लांब पळू लागले. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. चालक व त्याच्या साथीदाराने गॅस गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. पण गॅसचा प्रवाह जोरात असल्याने त्यांना यश आले नाही. तोपर्यंत त्या परिसरातील मोबाईल शॉपी, बँक, छोटी दुकाने, हॉटेल्स, मेडिकल आदी व्यावसायिकांनी शटर बंद करून तेथून धूम ठोकली.

गॅस गळतीने दोन्ही बाजूची वाहने थांबवण्यात आली. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साधारण 20 मिनिटात सीएनजीचे सिलिंडर मोकळे झाले. तेथे अग्निशमन दल दाखल झाले. पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. टेम्पो वाघवाडी येथील रिफिलिंग प्लांटवर नेण्यात आला. तेथे त्याची तपासणी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT