जत : जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत हे गेली चार दशके जतच्या राजकारणात सक्रिय आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जगताप यांचे नातू, तर सावंत यांचा मुलगा पराभूत झाला आहे. माझ्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पराभवाचे आत्मचिंतन करावे, असा स्पष्ट टोला आ. गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
आ. पडळकर म्हणाले, सावंत घराणे 40 वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहे. पतंगराव कदम यांचा त्यांना आशीर्वाद लाभला होता, असे चित्र असतानाही या निवडणुकीत जनतेने विक्रमसिंह सावंत यांना पुन्हा नाकारले आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये त्यांनी मुलगा धैर्यशील सावंत यांना उमेदवारी दिली; मात्र भाजपने उपेक्षित, दुर्लक्षित, सर्वसामान्य व गरीब घटकातील गौतम ऐवाळे यांना संधी दिली. त्यातून गौतम ऐवाळे यांनी धैर्यशील सावंत यांचा 159 मतांनी पराभव करत विजय मिळवला. हा लोकशाहीचा विजय असल्याचे आ. पडळकर म्हणाले.
माजी आमदार विलासराव जगताप हेही गेली 40 वर्षे राजकारणात सक्रिय असूनही त्यांना नातू संग्राम जगताप यांना निवडून आणता आले नाही. प्रभाग क्रमांक 11 मध्ये भटक्या समाजातील तरुण उमेदवाराने संग्राम जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले असून भाजपचे उमेदवार मिथुन भिसे मोठ्या फरकाने विजयी झाले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जगताप यांनीही आत्मचिंतन करावे, असा टोला आ. पडळकर यांनी लगावला.