सांगली

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये विटा पालिकेचा देशात प्रथम क्रमांक

रणजित गायकवाड

विटा : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण देशभरात राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये विटा शहराचा देशात पहिला क्रमांक आला आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली आहे.

विटा पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे विटा पालिकेने पुन्हा एकदा धवल यश मिळवले आहे. यावेळी पालिकेने स्वच्छ शहर म्हणून देशात अव्वल येण्याचा मान पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी माजी नगराध्यक्ष युवा नेते वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, दहावीर शितोळे, विजय जाधव, विनोद पाटील, भरत कांबळे, गजानन निकम, अविनाश चोथे, आनंदराव सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विटा पालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते.

वैभव पाटील म्हणाले, तमाम विटेकर नागरीकांच्या सहकार्याने विटा पालिकेने स्वच्छ शहर प्रकारात देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात विटा पालिकेने सातत्याने धवल यश मिळवले आहे. गतवर्षी पहिल्या चारमध्ये चमकलेल्या विटा पालिकेने यावर्षी देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. शहरातील नागरीकांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. विट्याचा स्वच्छ शहर म्हणून देशात पहिला क्रमांक आला आहे. आपण देशातील सर्वात स्वच्छ शहरात रहात असल्याचा अभियान शहरातील प्रत्येकाला अभिमान वाटतो आहे.

ते म्हणाले, विटा पालिकेचा दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरव होणार आहे. देशातील स्वच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील विटा पालिका पहिली, लोणावळा दुसरी आणि सासवड नगरपालिका तिसरी आली आहे. यामुळे देशाच्या पटलावर महाराष्ट्राने ही मोठी उपलब्धी केली आहे. आगामी काळात रोल मॉडेल म्हणून विटा शहराकडे पाहिले जाणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम केले पाहिजे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या विचारांनी विटा शहराची वाटचाल सुरू आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांनी एक व्हिजन घेऊन शहराचा विकास केला. त्याला मुर्त स्वरूप आले आहे. यासाठी अशोक गायकवाड यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले. विरोधी नगरसेवकांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. शहरातील नागरीकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते. त्यामुळे या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून विटा शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर बनले आहे. शहर स्वच्छतेच्या अभियानाची सुरुवात करताना तत्कालीन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार, असे वाटत होते. मात्र नुतन मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी त्याच गतीने काम केले, असा आवर्जून उल्लेख पाटील यांनी यावेळी केला.

वैभव पाटील यांनी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात एका स्वच्छता कर्मचारी प्रतिनिधीला बरोबर नेणार आहे. यातून देशभरात चांगला संदेश देण्याचा विटा पालिकेचा प्रयत्न असेल. शहर स्वच्छतेत योगदान देणाऱ्या स्वच्छता कर्म चाऱ्यांचा सन्मान व्हावा. त्यांच्या योगदानाचे देशात कौतुक व्हावे, असे मतही वैभव पाटील यांनी बोलून दाखवले.

SCROLL FOR NEXT