पलूस : दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पलूस शहराच्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी तब्बल 37 कोटी रुपयांच्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ झाला असून, या योजनेतून दिवाळीपूर्वी नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, अशी ग्वाही आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
पलूस येथे स्वतंत्र पाणी योजनेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे अध्यक्ष जे. के. (बापू) जाधव, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर-यमगर, राजारामबापू कारखान्याचे संचालक बाळासाहेब पवार, पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, ज्येष्ठ नेते भरत इनामदार उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्सव अभियानांतर्गत 37 कोटी 48 लाखांचा निधी पलूससाठी मंजूर करण्यात आला. या योजनेमुळे पलूसच्या पाणी समस्येवर तोडगा निघून दररोज 30 लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून शुद्ध पाणी मिळणार आहे. पलूस शहरातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
डॉ. कदम म्हणाले, पलूस शहरातील वाढती लोकसंख्या पाहता आराखडा तयार करणे आवश्यक होते. ज्यावेळी आराखडा तयार होत होता. त्यावेळी विरोधकांनी हरकत घेतलेली नाही. आता विरोधक राजकारण करून या आराखड्याला विरोध करीत आहेत. नगरपरिषद/नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर पलूस नगरपरिषदेची भव्य इमारत उभारण्यात येईल. तसेच हुतात्मा स्मारकाजवळील गाव तलावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येईल. मतदार संघातील अनेक विद्यार्थ्यांना भारती विद्यापीठातून तब्बल 80 लाख रुपयांची फी माफ करण्यात आली. काहीच काम न करणारे आज निवडणुकीच्या तोंडावर आरोप करीत आहेत. मात्र, आपण कामातूनच त्यांना उत्तर देत आहोत.
महेंद्र लाड म्हणाले, आमणापूर ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली. डॉ. विश्वजित कदम यांनी पतंगराव कदम यांच्या परंपरेतून काम केले.
वैभव पुदाले म्हणाले, भाजपा महायुती सरकारमुळे या योजनेसाठी निधी मिळाला नाही. गट नं. 70 वरून विरोधक कायम राजकारण करतात.
मुख्याधिकारी निर्मला राशीनकर-यमगर यांनी प्रास्ताविक केले. गिरीश गोंदिल, गणपतराव पुदाले यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास पुदाले यांनी स्वागत केले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. नितीन खारकांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यवंशी, गणपतराव पुदाले, संदीप शिसाळ, विशाल दळवी, अमोल भोरे, ऋषिकेश जाधव, मिलिंद डाके उपस्थित होते.