गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा; ख्रिश्चन समाजाची मागणी 
सांगली

Sangli : गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा; ख्रिश्चन समाजाची मागणी

अन्यथा 1 रोजी मंत्रालयावर लाँगमार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुध्द दखलपात्र गुन्हा नोंद करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अन्यथा 1 जुलै रोजी मंत्रालयावर लाँगमार्च काढू असा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला. आमदार पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी समस्त ख्रिस्ती समाज सांगली जिल्ह्याच्यावतीने गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.

याबाबत जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिश्चन धर्मगुरू पास्टर व सेवक यांना जिवे मारण्याची सुपारी देण्याचा इशारा दिला आहे. आमदार पडळकर यांचे वक्तव्य गुंडागर्दी, बदमाशी, असंविधानिक व मानवाधिकाराचे हनन करणारे आहे. ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली. या सर्व गोष्टींचा तपास पोलिस प्रशासन करत आहे. पण आमदार पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता, भय व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दुसर्‍याच्या धर्मावर आघात करणे, धमकी देणे, हिंसा भडकवणे, पास्टर यांना मारण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, हिंसक प्रतिसादाला उकसावणे हे लोकप्रतिनिधीचे कार्य नाही. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अन्यथा 1 जुलैरोजी मुंबई येथील मंत्रालयावर लाँगमार्च काढण्यात येईल.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत म्हणाले, पडळकरांनी अशी वक्तव्ये थांबवावी, अन्यथा योग्य धडा शिकवू. शेकापचे नेते अ‍ॅड. अजित सूर्यवंशी यांनी पडळकर यांच्याविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे आवाहन केले. यावेळी आंदोलनामध्ये गॅब्रियल तिवडे, विशाल कांबळे, विकास मगदूम, पॉल चॉको, राजू होळकर, संदीप चौगुले, राम कांबळे आदी सहभागी झाले होते.

कायदेशीर मार्गाने पडळकरांचा बंदोबस्त करू : आ. नायकवडी

आपला टीआरपी वाढविण्यासाठी आमदार पडळकर काहीही बरळत असतात. आपण अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी असून, कायदेशीर मार्गाने त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना दिला. त्यांच्या वक्तव्याबाबत विधिमंडळात आवाज उठवला जाईल. कायदा हातात न घेता त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. यासंदर्भात पोलिसांनी दखल घेतली असून, त्यांच्यावर कारवाई होईल. केवळ आपला टीआरपी वाढविण्यासाठी ते अशी वक्तव्ये करीत असून, तेही अल्पसंख्याकांचे नेते आहेत, याचे भान त्यांनी ठेवावे. त्यांचा समाजही त्यांच्या पाठीशी नाही, हेही लक्षात ठेवावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT