कवठेमहांकाळ ः विठुरायाची वाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे चॉपरने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवार, दि. 2 मेरोजी सकाळी मृत्यू झाला. सौरभ नामदेव चव्हाण (वय 23, रा. विठुरायाचीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शंकर रामा टोणे याला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी, सौरभ याच्या नात्यातील तरुणीस संशयित शंकर टोणे त्रास देत होता. याबाबत सौरभने वारंवार त्याला समजावले होते, मात्र तो ऐकत नव्हता. सोमवार, दि. 28 रोजी कवठेमहांकाळ-विठुरायाचीवाडी रस्त्यावरील एका मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा यावरून वाद झाला. शंकरने ‘तू कोण मला विचारणारा, तुझ्यामुळे मला अडचण होते’ असे म्हणत सौरभला शिवीगाळ केली. खिशातून चॉपर काढून त्याच्या डाव्या खांद्यावर व पोटाच्या डाव्या बाजूस वार केले. हल्ल्यात सौरभ गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या पथकाने शंकर टोणे याला ताब्यात घेतले होते. जखमी सौरभ यास मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर संशयित शंकर टोणे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.