सांगली : चिंचली (ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील श्री मायाक्कादेवीची यात्रा 3 ते 7 फेब्रुवारीदरम्यान होत असून यासाठी सांगली जिल्ह्यातील दहाही आगारांतून 111 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. गरजेनुसार या बसेसच्या फेऱ्यात वाढ होणार आहे. या यात्रेतून सुमारे 36 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.
यासाठीचे नियोजन विभागीय कार्यालयाकडून विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. यात्रा कालावधीमध्ये प्रवास भाड्यावर कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या आदेशानुसार 30 टक्के जादा भाडे आकारणी करण्यात येणार असल्याने यात्रेसाठी जाणाऱ्या वाहकांना याबाबतच्या सूचना देण्यात येत आहेत. सांगली विभागातील सर्व आगारापासून यात्रेसाठी टप्पा वाहतुकीचे तात्पुरते 67 वाहतूक परवाने काढण्यात आले आहेत. यापूर्वी कायम मंजूर असणारे 8 परवाने, सांगली 2, मिरज 2, ईश्वरपूर 2, कवठेमहांकाळ 2 असे याबरोबर एकूण 75 परवान्यांचे वाटप यात्रा कालावधीपूर्वी करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यासह पंधरा एसटी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.