सांगली

Chandrayaan 3 : गगनयानच्या टीममध्ये मिरजेच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; बंगळूरच्या इस्त्रोमध्ये कार्यरत

दिनेश चोरगे

मिरज; जालिंदर हुलवान :  चांद्रयान तीन साठी काम करणार्‍या भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या टीममध्ये मिरजेतील डॉ. राजन भारत कुराडे यांचा सहभाग होता. या पूर्वीच्याही दोन्ही चांद्रयान मोहिमात त्यांनी योगदान दिले आहे. पुढील काही वर्षांमध्ये मानवयुक्त गगनयान झेपावणार आहे, त्या टीममध्येही कुराडे यांचा सहभाग आहे.

चंद्रावरील पृष्ठभाग, त्याच्या पोटात दडलेली खनिजे, त्या उपग्रहावरील वातावरण अशा गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताचे चांद्रयान- तीन हे शुक्रवार दि. 15 जुलै रोजी अवकाशात झेपावले. यापूर्वीही भारताने अशी दोन चांद्रयान अवकाशात पाठविली होती. चांद्रयान- तीन तयार करण्यासाठी इस्त्रोच्या ज्या शास्त्रज्ञांचा सहभाग होता, त्यामध्ये मिरजेतील डॉ. राजन कुराडे यांचाही सहभाग होता.
कुराडे हे मूळचे मिरजेचे आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मिरजेच्या विद्यामंदिर प्रशालेमध्ये झाले आहे. राजन यांचे वय 42 आहे. गेले अठरा वर्षे ते इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून संशोधन करीत आहेत. मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथे त्यांनी मेकॅनिकलचा डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकलची डिग्री घेतली. एरोस्पेस इंजिनिअरिंगची उच्च पदवी कानपूरच्या आयआयटी येथून घेतली. त्यानंतर 2005 रोजी ते बंगळूरच्या नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी येथे वरिष्ठ प्रिन्सिपल शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. रॉकेट, मिसाईल, फायटर एअरक्राफ्ट तयार करणार्‍या टीममध्ये त्यांचे योगदान आहे. त्यांनी आत्तापर्यंत वीस संशोधन निबंध प्रसिद्ध केले आहेत. भारताने आत्तापर्यंत तीन चांद्रयान अवकाशात प्रक्षेपित केले आहेत. त्या तीनही चांद्रयानासाठी राजन यांनी योगदान दिले आहे.

शुक्रवारी चांद्रयान- तीनचे प्रक्षेपण झाले. त्याचे गेले दोन ते तीन वर्षे टेस्टिंग सुरू होते. या चांद्रयानाचे टेस्टिंग पहिल्यांदा ग्राऊंडवर केले जाते ते राजन यांनी केले आहे. चांद्रयानामधील प्रक्षेपण हे सर्वात शेवटचा भाग असतो, त्याआधी खूप प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमध्ये एरोडायनॅमिक संशोधनाचा भाग असतो. चांद्रयान दिसायला कसे असावे, त्याचा आकार किती असावा, त्याची रेंज किती असावी, या सर्व बाबींचे संशोधन डायनॅमिक संशोधनात केले जाते. हे संशोधन शास्त्रज्ञ राजन यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी ही देशातील सर्वात मोठी वेंटर्नल आहे. 1960 मध्ये ती सुरू झाली.

मानवयुक्त गगनयान देशाच्या फायद्याचे व अभिमानाचे : शास्त्रज्ञ डॉ . राजन कुराडे

शास्त्रज्ञ डॉ. राजन कुराडे दै. पुढारीशी बोलताना म्हणाले, आत्ता इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडून बंगळूर येथे मानवयुक्त गगनयान बनवण्याचे काम सुरू आहे. या टीममध्ये माझाही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून या गगनयानाबाबत काम सुरू आहे. अजूनही दोन वर्षे हे काम चालेल. हे काम खूप मोठे आणि जबाबदारीचे आहे. यातील रॉकेटचा साईज कमी करायचा प्रयत्न आहे. अंतराळाचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, त्याचा अभ्यास करण्यासाठी या यानाचा खूप मोठा फायदा भारत देशाला होणार आहे. या कामकाजातील माहिती अत्यंत गोपनीय असते. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतरच सर्व सविस्तर माहिती सांगता येईल.

भारत पहिल्यांदाच बनणार मानवयुक्त गगनयान…

मानवयुक्त गगनयान हे यापूर्वी अमेरिकेने बनवले आहे. असे गगनयान बनवण्याचे काम फारच कमी देशांमध्ये केले जाते. मानवयुक्त गगनयान हे आता भारतात पहिल्यांदाच बनवले जात आहे. आत्तापर्यंतच्या तीनही गगनयानांमध्ये मानवाचा समावेश नव्हता. मात्र आत्ता बनणारे हे गगनयान तिघांना अवकाशात घेऊन उड्डाण करणार आहे.

SCROLL FOR NEXT