सांगली : काँग्रेसला जर अकरा सदस्यांवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले तर आपण काँग्रेसचा विजय मान्य करू, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
पुढील निवडणुकांत भाजपचा पराभव होणार असल्याचे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले होते, यावर प्रश्न विचारता चंद्रकांत पाटील म्हणाले की, आता सलग सर्व निवडणुका झाल्या आहेत, त्यामुळे जय पराजयचा प्रश्नच येत नाही. सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होणारच, यात काही शंका नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी व्हीप जारी केले तर बंडखोरावर कारवाई होईल, असे मी म्हटले होते. त्यांना मी कायदा सांगितला होता. यामध्ये कोणाला भीती दाखवण्याचा प्रश्नच येत आहे. हे जर आवडणार नसेल तर हेही सांगणे बंद करून टाकू, असेही ते म्हणाले.
द्राक्ष उत्पादकांचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेऊ नये आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षे, बेदाणे व हळद व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी मुंबईतील बंदरामध्ये द्राक्षांचे कंटेनर अडकून पडले आहेत. याचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी दर पाडण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांना आम्ही विनंती करतो की, द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत, ते आपलेच आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीचा गैरफायदा व्यापाऱ्यांनी घेऊ नये. तुम्हाला परमेश्वर माफ करणार नाही. त्यामुळे एकमेकांना साथ देऊन अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.