Chandrakant Patil Pudhari
सांगली

Chandrakant Patil: ट्रम्पला हरवल्यासारखा महाआघाडीचा अविर्भाव

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला : सांगलीचा राजा हा भाजपच; महायुतीच्या मित्रपक्षांना फोडून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला

पुढारी वृत्तसेवा

मिरज : महायुतीच्या मित्र पक्षांचे सदस्य फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाच हरवल्यासारखा महाआघाडीच्या नेत्यांचा अविर्भाव आहे, असा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत पत्रकार बैठकीत लगावला. आमदार गोपीचंद पडळकर व भाजपला विरोध करण्यासाठी दादा-बापू घराण्याच्या तीन पिढ्यांचे वैर त्यांनी संपवले. राजकारणात जय पराजय होतात. मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांना दिला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, निवडणुकीमध्ये आमच्यूाश्र काही चुका होत्या. त्याचे आत्मचिंतन करू. आम्हाला मित्र पक्षांसोबत समन्वय साधता आला नाही, हेसुद्धा मान्य करतो. यापूर्वीही माझ्यावर टीका-टिपणी झाली. 47 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेकदा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. पण माझी तपश्चर्या फार मोठी आहे. त्यामुळे काही फरक पडला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपलाच सर्वाधिक म्हणजे 32.52 टक्के मते मिळाली. शरद पवार राष्ट्रवादीला 20 टक्के काँग्रेसला 18 टक्के अजित पवार राष्ट्रवादीला 12, तर शिंदे शिवसेनेला 10 टक्के मते मिळाली. त्यामुळे भाजपच सांगलीचा राजा आहे.

ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्काविषयी, खासदार संजय पाटील हे साक्षीदार आहेत. मी त्या घटनांचा पार्ट आणि पार्सल आहे. मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या, तर जयंत पाटील यांची अडचण होईल. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शेखर इनामदार, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी सभापती सुरेश आवटी उपस्थित होते.

विशाल पाटील यांना अहंकार कशासाठी?

मंत्री पाटील म्हणाले, सतत भाजपवर बोलणाऱ्या खासदार विशाल पाटील यांनी आपण 2029 ला खासदार होणार आहे का? याबाबत विचार करावा. विशाल पाटील हे कसे निवडून आले? भाजपावर खोटे आरोप करून विशाल पाटील निवडून आले. पण विशाल पाटील यांना अहंकार कशासाठी पाहिजे? तुम्हाला भाजपमध्ये कोण बोलवले आहे? इतका भाव तुम्ही खाऊ नका.

मिरज पंचायत समितीचे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात...

पालकमंत्री पाटील म्हणाले, मिरज पंचायत समितीमध्ये सभापती-उपसभापती निवडीपूर्वी सदस्याचे अपहरण झाले. भाजपाला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र आले. आता हे प्रकरण विभागीय आयुक्त यांच्या कोर्टात आहे. त्याची सुनावणी होईल. मात्र असा प्रकार करणारे आता पळून गेले आहेत, फरार झाले आहेत. त्याची शिक्षा ते भोगतील. मात्र जो प्रकार घडला, तो चिंताजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT