विटा : सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या मागच्या नेत्यांनी विकासाचे श्रीखंड केवळ आपल्याच तालुक्यांच्या ताटात ओढून घेतले. त्यांनी जिल्ह्याचे नव्हे, तर फक्त आपल्या तालुक्याचे नेतृत्व केले. त्यामुळेच जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर हे चार तालुके विकासापासून वंचित राहिले, अशा शब्दांत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री जयंत पाटील, दिवंगत नेते पतंगराव कदम व दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाना साधला.
खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, ब्रह्मानंद पडळकर आणि कुलसचिव व्ही एम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी केवळ आपल्या तालुक्यांपुरताच विकास पाहिल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि खानापूर हे तालुके दुष्काळीच राहिले. या तालुक्यांना पाणी आणि सिंचन योजना मिळाल्या नाहीत. पाणी नसल्याने पिके आली नाहीत आणि परिणामी श्रीमंती आली नाही. पण आम्ही आता संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा सपाटा लावला आहे. खानापूरपासून मंगळवेढ्यापर्यंत पाणी पोहोचल्याने जमीन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे एक दिवस आमदार पडळकर आम्हाला खानापुरात विमानतळ करा, अशी मागणी करतील की काय ? अशी भीती वाटू लागली आहे, असा मिश्किल टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
खानापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राबद्दल बोलताना मंत्री पाटील म्हणाले, एका महिन्याच्या आत भाड्याच्या जागेत का होईना, पण शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र येथे सुरू करू. सुचवलेल्या चार जागांपैकी लोकनेते हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्टच्या 'ॲपेक्स पब्लिक स्कूल'ची जागा निश्चित करत आहोत. वैभव पाटील यांनी हे मोठे काम आमच्या जागेत करा, आम्ही भाडे घेणार नाही, असे सांगितले आहे. मी त्यांच्याकडे चहाला जाणार आहे, तेव्हा एक रुपयाही भाडे घेणार नाही, हे पुन्हा एकदा त्यांच्याकडून वदवून घेईन,असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना खानापूर तालुक्याचे नाव बदलून 'भवानीपूर' करण्याची मागणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, नामांतरासाठी मोठा अभ्यास आणि ऐतिहासिक पुरावे गोळा करावे लागतात. औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' करण्यासाठी ३८ वर्षे लागली तर इस्लामपूरचे 'ईश्वरपूर' करण्यासाठी किमान १०-१२ वर्षे गेली. यासाठी चिकाटी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आवश्यक असतो. आता खानापूरचे नाव 'भवानीपूर' का करायचे याबाबत सर्व ऐतिहासिक, भौगोलिक आणि पूरक कागदपत्रे तुम्हाला गोळा करून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.