सांगली : सन 2025-26 ची प्रशासकीय मान्यताप्राप्त कामे सुरू करा. जिल्हास्तरीय कामांकरिता तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित अवधी पाहता तसेच सुटीचा कालावधी लक्षात घेता, सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही गतीने करावी, यासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जिल्ह्यातील विविध राज्यस्तरीय कार्यान्वयीन यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलिस दल, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची सद्यस्थिती, अर्थसंकल्पीय तरतूद आदींचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी सादरीकरण केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह राज्यस्तर यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदींसह शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.