सांगली : येथे सोमवारी राज्य कला प्रदर्शनामध्ये ना. चंद्रकांत पाटील, खा. विशाल पाटील, गौतम पाटील, विशाल नरवाडे, किशोर इंगळे, महापौर धीरज सूर्यवंशी, संदीप आवटी, जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. (छाया : सचिन सुतार) 
सांगली

Chandrakant Patil : मुंबईत चारमजली आर्ट गॅलरी, विश्वविद्यालय उभारणार

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील ः राज्य कला प्रदर्शन सुरू; ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा सन्मान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : चित्र व शिल्पकला स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षिसे... कला क्षेत्रातील पदवीसाठी विक्रोळीला केंद्रीय कला विश्वविद्यालय आणि डिप्लोमासाठी कला बोर्ड.. जे.जे.मध्ये चारमजली आर्ट गॅलरी.. सांगलीचे राज्य कला प्रदर्शन बघायला येणाऱ्या शाळांना फुकट प्रवास.. फुकट नाष्टा... अशी अनेकविध कलरफुल आश्वासने देत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कलाकारांना धक्क्यावर धक्के दिले. निमित्त होते राज्य कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे...

कला संचालनालयाच्यावतीने विद्यार्थी विभागाचे 65 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन सोमवारपासून शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात सुरु झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील यांनी कलाकार, विद्यार्थी आणि एकूणच कला क्षेत्रासाठी महत्त्वाची आश्वासने दिली. खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, महापालिका सभागृह नेते संदीप आवटी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पुरस्काराचे मानकरी जी. एस. माजगावकर, कला संचालक किशोर इंगळे, राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, प्रदर्शन अधिकारी स्मिता किंकळे, प्रदर्शन समन्वयक विजय बोंदर यांच्यासह राज्यातील कलाक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, कला क्षेत्राला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक उपाययोजना व उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक वर्षे रिक्त असलेली पदभरती केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस रकमेत भरघोस वाढ केली आहे. कला पदवी घेण्यासाठी केंद्रीय कला विश्वविद्यालयाची विक्रोळी येथे सुरुवात झाली आहे, शिवाय पदविकेसाठी स्वतंत्र कला बोर्ड तयार केले आहे. हे बोर्डच आता अभ्यासक्रम तयार करेल, परीक्षा घेईल आणि निकाल जाहीर करेल.

खासदार विशाल पाटील म्हणाले, कलाक्षेत्रात शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे योगदान मोठे आहे. कलावंतांची पुढील पिढी ही कला परंपरा नक्कीच वृध्दिंगत करेल. कला संचालक किशोर इंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाची स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. हे प्रदर्शन 22 फेब्रुवारीपर्यंत विनाशुल्क सुरू राहणार असून, याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT