सांगली : देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून सांगत होते, की मालेगाव सोडले, तर 25 ठिकाणी महायुतीचे महापौर होतील. त्यातल्या प्रमुख महापालिकेत भाजपचे महापौर होतील. तसेच चित्र आज संपूर्ण महाराष्ट्रात आहे. राजकारणामध्ये थोडं जास्त मागायचं असतं. राजकारणात असं असतं, की जास्त मागितलं की थोडं मिळतं. पण मी कोणाला कमी लेखत नाही. त्यांचे प्रपोजल येऊदे. बऱ्याचवेळा मी आणि देवेंद्र फडणवीस अपेक्षेपेक्षा जास्त देऊन टाकतो. आरपीआयला आम्ही हुपरीचे नगराध्यक्ष पद दिले. पुण्यासारख्या शहरात पाच वर्षे उपमहापौरपद दिले. त्यामुळे आम्ही देण्यात कंजूस नाही, फक्त वाजवी मागितलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना दिला.
विश्वजित कदम हे पैशाची टीका करून सामान्य नागरिकांवर आरोप करतायेत. तुम्ही दादागिरीने आणि पैशाने दबता, हा इथल्या सामान्य नागरिक आणि मतदारांवर केलेला आरोप आहे. संजय राऊत हे काहीही करू शकतात. जेव्हा त्यांच्या खासदारकीची टर्म संपते, तेव्हा ते राज्यसभेत जाऊ शकत नाहीत. बाकी ते कोठेही जाऊ शकतात. उद्धव ठाकरेंचे देव कोणते आहेत हे माहीत नाही. महाराष्ट्रात फक्त देवाभाऊ आहेत. ते इतके उदार आहेत, की ते काहीही करू शकतात.
राष्ट्रवादी एकीकरण...
हे दोन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षाचे नाव काय असेल आणि त्यांचे चिन्ह काय असेल? घड्याळ वापरणार की तुतारी वापरणार? न्यायालयात असलेली केस मागे घेणार? हा मला पडलेला प्रश्न आहे.
उद्धव ठाकरे यांची निवडणुकीआधी स्क्रिप्ट
उद्धव ठाकरे यांच्याविषयी ते म्हणाले, निवडणुकीच्या आधी त्यांनी शाईसारखी प्रकरणे काढून पाहिली. पण लक्षात आलं, की याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी निवडणुकीच्या आधी स्क्रिप्ट लिहिली, की आम्ही का हरलो. शाई पुसली जात होती, नवीन मशीन वापरले, असा आरोप केला. महापौर हा मुंबईत भाजपचाच होणार. जे न देखे रवी ते देखे संजय. त्यामुळे ते काय म्हणतात ते त्यांनाच माहिती.
मुंबई महापौर पद...
मुंबईचा महापौर ठरविण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे समर्थ आहेत. मुंबईत व्यवस्थित ठरेल. कोणतीही अडचण येणार नाही. हा सस्पेन्स तयार झाला आहे. त्या सस्पेन्समधून खूप उत्तम झालं, हेच पुढे येईल. विरोधकांनी प्रयत्न करावा, त्यांना कोणी नाही म्हटलं आहे?