सांगली : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला रामराम करत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, सोमवारी दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ठाण्यातील कियारा बँक्वेट हॉलमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. यावेळी पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांचाही पक्षप्रवेश होणार आहे.
चंद्रहार पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. आता त्याला चंद्रहार पाटील यांनीच समाजमाध्यमातून दुजोरा दिला आहे. ‘राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करीत असताना बर्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाजदेखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी माझ्या सहकार्यांसह सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत आहे’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी पंगा घेतला होता. ठाकरे यांनी स्वत: मिरजेत येत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घाईने घोषित केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. त्यांनी उमेदवारी परस्पर जाहीर केली, आम्हाला विचारलेच नाही, असे घटकपक्षांचे म्हणणे होते.
चंद्रहार पाटील यांनी क्रीडा क्षेत्रासाठी सरकारसोबत जात असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर केली आहे. त्यांना विटा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारायचे आहे. ते त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद आवश्यक आहे. त्यामुळे चंद्रहार सरकारसोबत जात असावेत, असा अंदाज आहे.