वारणावती : वारणामाईच्या कुशीत आजवर जगलो. वेळ आली तर तिच्या कुशीत मरायलाही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देत चांदोली प्रकल्पग्रस्तांनी गुरुवारी वारणा नदीपात्रात उतरून आंदोलन केले.
श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली व डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मणदूर (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा गुरुवारी 43 वा दिवस होता. आंदोलन मोठ्या ताकतीने सुरूच आहे. सकाळी आंदोलकांनी वारणा नदीपात्रात उतरून पाण्याचे पूजन केले. यानंतर आमच्या आंदोलनाच्या विषयावर बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली नाही, तर वारणा नदीत स्वतःचा जीव देऊ. स्वतःला माय-बाप समजणार्या सरकारने प्रकल्पग्रस्तांवर ही वेळ येऊ नये, याची दक्षता घ्यावी, असा इशारा दिला. आंदोलनामध्ये मारुती पाटील, आनंदा आमकर, दाऊद पटेल, जगन्नाथ कुडतुडकर, एम. डी. पाटील, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, लक्ष्मण सुतार यांच्यासह प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.