Chandoli Dam 
सांगली

Chandoli Dam : ‘चांदोली’ लवकरच १०० टक्के भरणार..!

वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटणार; १ टीएमसी पाण्याची आवश्यकता

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : चांदोली (वारणा) धरणाचे दरवाजे सध्या बंद आहेत. दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून, धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. काल, रविवारी धरणात एकूण ३३.४० टीएमसी म्हणजे ९७.१० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण १०० टक्के भरण्यास केवळ एक टीएमसी पाणीसाठा आवश्यक आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा २६.५२ टीएमसी म्हणजे ९६.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणाची सध्याची पाणीपातळी ६२६.०६ मीटर असून, एकूण पाणीसाठा ९४५.९८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आगामी काळात पावसाची अशीच समाधानकारक हजेरी राहिल्यास चांदोली धरण लवकरच शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

चांदोली परिसरात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत २ हजार ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात २० मिलिमीटर पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातून धरणात सध्या ५ हजार २०८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात २५.०४ टीएमसी म्हणजे ९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा हा साठा २६.५२ टीएमसी म्हणजे ९६.३८ टक्के झाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपयुक्त पाणीसाठ्यात १.४८ टीएमसीने वाढ झाली आहे.

दरम्यान, धरणातील वीजनिर्मिती गृहातून सध्या १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. सांडव्यावरून सध्या विसर्ग बंद आहे. एकूणच धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे वर्षभराचा सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT