शिराळा शहर : नागपंचमी उत्सव हा कायद्याच्या कचाट्यात आहे. त्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. त्याचीही माहिती लवकरच आपल्याला मिळेल. तुमच्या मनासारखी नागपंचमी साजरी होण्यासाठी नक्कीच प्रयत्न चालू आहेत. आपल्याला त्यात यश मिळेल, अशी आशा आहे. उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश असल्याने शिराळकरांनी संयम बाळगून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथील तहसील कार्यालयात प्रशासनाच्यावतीने नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामला खोत - पाटील, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, नायब तहसीलदार राजेंद्र शिद, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील, डॉ. नूतनगौरी कणसे - टकेकर, प्रवीण तेली, शैलेश साळुंखे, रणजितसिंह नाईक, सम्राटसिंह शिंदे, पृथ्वीसिंग नाईक, केदार नलवडे, सचिन नलावडे, अभिजित शेणेकर आदी उपस्थित होते.
आमदार देशमुख म्हणाले, उत्सवाची सर्व माहिती मिळण्यासाठी तहसील कार्यालयात वॉररूम तयार करा. महावितरणने 28 ते 30 जुलैपर्यंत अखंडित वीजपुरवठा करावा. यामध्ये कुठे अडचण आल्यास संबंधित अधिकार्यांनी कारवाईला सामोरे जावे. आरोग्याच्यादृष्टीने आरोग्य विभागाने तातडीची सेवा द्यावी. नगरपंचायतीने औषध फवारणी, जागा वाटप, नाग मंडळ परवानगी, टॉयलेट व्हॅन, अग्निशमन यंत्रणा याची व्यवस्था करावी. नाग मंडळांनी कायद्याचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन म्हणाले, कोणताही अनुचित प्रकार प्रशासन सहन करणार नाही आणि केल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणताही अनुचित प्रकार नाग मंडळांनी करू नये. गौरव नायकवडी यांनी अचानक बैठकीत हजेरी लावली. आमदार सत्यजित देशमुख यांनी, नागनाथअण्णा नायकवडी महामंडळ तातडीने कार्यान्वित व्हावे यासाठी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. त्यासाठी आमदार देशमुख यांचा सत्कार नायकवडी यांनी केला.
जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव आठ दिवसांवर आला असताना नगरपंचायत अजूनही नागरी सुविधा देण्यात असमर्थ आहे, असा आरोप प्रा. सम्राट शिंदे, सत्यजित कदम, वसंत कांबळे यांनी केला. भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असताना नगरपंचायत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप करीत फलक दाखवले.
प्रशासनाने मिरवणुकीची वेळमर्यादा ही रात्री आठ वाजेपर्यंत दिली आहे. ती वेळ नऊ वाजेपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी नाग मंडळांनी प्रशासनाकडे केली. त्यावरही गदारोळ झाला. प्रशासनाने मात्र ही वेळ वाढवता येणार नाही, असे सांगितले.