शिराळा : रिळे (ता. शिराळा) येथे मक्याच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिराळा पोलिसांनी छापा टाकून 11 हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली आहेत. संशयित शंकर प्रकाश सपकाळ (रा. रिळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिळे येथील शेती गट नं. 150/1 मधील मक्याच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. 13 मार्च रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास फुपिरे फाटा परिसरातील एका शेतात पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मक्याच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची जोपासना केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी मुळासह उपटलेली एकूण 17 हिरवट रंगाची गांजासदृश रोपे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या रोपांचे एकूण वजन 1.334 किलोग्रॅम भरले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 11 हजार रुपये आहे. फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन पथकाने एका रोपाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून, उर्वरित 16 झाडे सील केली आहेत.
याप्रकरणी हवालदार प्रदीप सर्जेराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित शंकर सपकाळ याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उदय पाटील करत आहेत.