विटा : नवी दिल्लीतील आत्महत्येच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच दिवंगत शौर्य पाटील याला न्याय मिळावा, या मागणीसाठी शनिवारी (दि.22) विटा शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. “शौर्य पाटील अमर राहो”, “शौर्यला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढवळेश्वरच्या पाटील कुटुंबियांसह शहरातील नागरिकांनी या प्रसंगी सहानुभूती व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) येथील विद्यार्थी शौर्य पाटील याने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून नवी दिल्ली येथे आत्महत्या केली होती. या घटनेला पाच दिवस उलटून गेले असले तरी जनमानसातील संताप अजूनही ओसरलेला नाही. त्याच भावनेचे प्रतिबिंब विट्यातील कॅन्डल मार्चमध्ये प्रकर्षाने दिसून आले.
दिवंगत शौर्य पाटीलचे छायाचित्र, ‘जस्टिस फॉर शौर्या’, ‘शौर्यच्या न्यायासाठी’ असे फलक हातात घेऊन शेकडो नागरिक सायंकाळी रस्त्यावर उतरले. शौर्यच्या कुटुंबीयांसह आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते, अॅड. सचिन जाधव, दिलीप किर्दत, राजू किर्दत, महेश फासे, अभिजीत किर्दत, आनंदा माळी, रवी किर्दत, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुणाई आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हातात प्रज्वलित मेणबत्त्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात आलेला हा मार्च पंचमुखी गणपती मंदिर, विटा नगरपालिका, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा मार्ग काढत पुन्हा शिवाजी चौकात संपला. त्यानंतर तहसीलदार योगेश टोम्पे यांना नवी दिल्ली येथील सेंट कोलंबस शाळेतील संबंधित चार शिक्षकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
यावेळी संवेदना व्यक्त करताना आमदार सुहास बाबर म्हणाले, “ही घटना अत्यंत दुःखद असून आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व माहिती दिली आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शौर्यचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही.”
माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, “या घटनेची गंभीरता ओळखून शासनाने तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांगीण उपाययोजना करणे अनिवार्य आहे. गरज पडल्यास आपण मुंबई मंत्रालय किंवा केंद्रस्तरावरही धडक देऊ. याबाबत आमची मुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे.” अॅड. सचिन जाधव आणि शंकर मोहिते यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कॅन्डल मार्च सुरू असताना आमदार सुहास बाबर यात सहभागी झाले. त्यांना पाहताच शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांची भावनावश अवस्था झाली. त्यांनी आमदार बाबर यांच्या खांद्यावर डोके ठेवत आसवे गाळली आणि शौर्यसंबंधी घडलेली सर्व हकीकत रडता रडता व्यक्त केली. या क्षणी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले.