Burglary Pudhari
सांगली

Sangli Burglary: सांगलीत घरफोडी; १३ तोळे सोन्यासह सहा लाखांची चोरी

विजयनगर परिसरात घटना, कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांचा प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील विजयनगर परिसरातील अष्टविनायकनगरमध्ये बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने तेरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाखांची रोकड, असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दगडू पांडुरंग सरगर (वय ५१) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू सरगर यांचे अष्टविनायकनगर गल्ली क्रमांक तीनमध्ये घर आहे. ते हमालीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी सात वाजता घराला कुलूप लावून ते बाहेर गेले होते. त्या वेळी चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटला. चोरट्याने कपाटातील दीड लाखांच्या रोकडसह २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाच्या आठ अंगठ्या, २१ ग्रॅमचा लक्ष्मीहार, ११ ग्रॅमची चेन, दहा ग्रॅमचा नेकलेस, सात ग्रॅमची कर्णफुले, पाच ग्रॅमची बोरमाळ, पाच ग्रॅमची साखळी, पाच ग्रॅमचा सोन्याचा वेल, चार ग्रॅम वजनाची ठुशी, दोन ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, एक ग्रॅमचा बदाम आणि ३५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

सरगर हे गुरुवारी सकाळी घरी परतले, त्या वेळी त्यांना चोरीचा हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तातडीने संजयनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला. सराईत चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT