बुधगाव : सांगली-तासगाव रस्त्यावर वळूच्या धडकेत महिलेचा बळी गेला. दोन मस्तवाल वळूंच्या झुंजीदरम्यान एका वळूने जोरदार धडक दिल्याने अलका लाला कांबळे (वय 55) गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सांगली-तासगाव रस्त्यावर दोन वळूंची झुंज सुरू होती. यावेळी तेथून जाणार्या अलका कांबळे यांना एका वळूने जोरदार धडक दिली. या धडकेने जमिनीवर आदळल्याने कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, डोक्यात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अलका कांबळे आपल्या वृद्ध आईसोबत जोतिबानगर परिसरात राहत होत्या.
प्रशासनाचे दुर्लक्ष
गावात पन्नास ते साठ मोकाट गाई आणि वळूंचा वावर आहे. कचरा डेपो, शाळेचा परिसर, राजवाडा आणि दर्गा परिसरात त्यांचे कळप नेहमीच दिसतात. या जनावरांमुळे लहान-मोठ्या दुर्घटना अनेकदा घडल्या आहेत, ज्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच, शेतकर्यांच्या शेतीत घुसून ही जनावरे मका, भुईमूग, हरभरा, ज्वारी आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान करत आहेत.