सांगली ः चोरट्यांनी फोडलेले एटीएम. pudhari photo
सांगली

बुधगावमध्ये एटीएम फोडून 17.46 लाखांची रोकड लंपास

गॅस कटरने मशिन तोडले; परराज्यातील टोळीवर संशय

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः बुधगाव (ता. मिरज) येथील बसस्थानक परिसरातील बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांनी फोडले. एटीएममधील 17 लाख 46 हजारांची रोकड लंपास केली. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. चोरट्यांनी गॅस कटरने मशिन तोडल्याने ते काही प्रमाणात जळाले. परराज्यातील टोळीकडून हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तीन पथके त्यांच्या मागावर आहेत. लवकरच या चोरीचा छडा लावला जाईल, असे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. याप्रकरणी एटीएम केंद्राची स्वच्छता ठेकेदार निशा कंपनीचे पर्यवेक्षक संभाजी मारुती चव्हाण (रा. फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सांगली-तासगाव रस्त्यावरील बुधगाव येथे बस थांब्याजवळ बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एसटीएममध्ये तीन दिवसांपूर्वीच लाखो रुपयांची रोकड भरण्यात आली होती. बुधवार, दि. 21 मेरोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आलिशान मोटारीतून चोरटे बुधगावात आले. त्यांनी चेहर्‍यावर काळा मास्क लावला होता.

एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्याने त्यांनी आत प्रवेश करून शटर बंद केले. त्याठिकाणचे सीसीटीव्हीही बंद केले. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून त्यातील 17 लाख 46 हजारांची रोकड काढून घेतली. अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास केली. सीसीटीव्ही बंद करण्यापूर्वीचे चोरट्यांचे चित्रीकरण मिळाले आहे. सकाळी साडेपाच वाजता फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना एटीएम फोडल्याची घटना निदर्शनास आली. एटीएम गॅस कटरने फोडल्याने ते काही प्रमाणात जळाले होते. त्यातून धूर येत होता. नागरिकांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली.

ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीने खळबळ उडाली होती. तपास सहायक फौजदार मेघराज रुपनर करीत आहेत.

इचलकरंजीनंतर सांगलीत एटीएम फोडले

इचलकरंजीजवळील यड्राव येथे रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडले. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास बुधगाव येथे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केली. या दोन्ही चोरीत एकाच टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आतापर्यंतच्या घटना

1) जत तालुक्यातील डफळापूर येथे दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

2) मिरज तालुक्यामधील आरग येथे चोरट्यांनी दि. 23 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री जेसीबीने एटीएम फोडले. नागरिक जागे झाल्याने एटीएममधील 27 लाख रुपयांची रोकड तेथेच टाकून पलायन केले.

3) कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे गोळीबार करत पहाटेच्या सुमारास 20 लाखाची रोकड असलेले एटीएम चोरट्यांनी पळवले.

हरियाणातील टोळीकडून चोरी

परराज्यातील टोळीकडून एटीएम फोडून लाखोंची रोकड लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीतील चित्रीकरणावरून ही टोळी हरियाणातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्तकेला. आलिशान मोटारीतून फिरत असल्याने चोरट्यांच्या टोळीचा नागरिकांना संशय येत नाही. टोळीच्या मागावर एलसीबीची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच टोळीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT