आष्टा : येथील आष्टा लायनर्ससमोर गुरुवारी दुपारी जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील भाऊ व बहीण गंभीर जखमी झाले होते. यात उपचारादरम्यान भावाचा मृत्यू झाला. आष्टा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. प्रथमेश समीर लाड (वय 28, रा. डांगे कॉलेजजवळ, आष्टा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून पद्मश्री सुनील पाटील (30, आष्टा) असे त्याच्या जखमी बहिणीचे नाव आहे. अनिल सत्यम सिंग (32, रा. रोड प्लॅन्ट, इस्लामपूर) असे संशयिताचे नाव आहे.
प्रथमेश व पद्मश्री हे दोघेजण दुचाकी (क्र. एमएच 10 सी.वाय 7243) वरून बेलवडे (ता. कराड) येथे जाऊन आष्ट्याला परत येत होते. आष्टा लायनर्ससमोर जेसीबी (क्र. एमएच09 जी.एम. 4369) चालकाने चुकीच्या दिशेने भरधाव वेगात जेसीबी चालवून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात प्रथमेश याच्या पोटास आणि उजव्या हातास गंभीर मार लागला होता, तर पद्मश्री यांच्या डोक्याला व कमरेस जखमा झाल्या आहेत. गंभीर प्रथमेश याला उपचारासाठी भारती हॉस्पिटल, मिरज येथे हलवण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना शुक्रवार दि. 30 रोजी रात्री प्रथमेश याचे निधन झाले. याबाबत प्रथमेश याचे चुलते राजेश बापू लाड (रा. आष्टा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आष्टा पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.