Brahmanand Padalkar | ‘आम्ही आणि वैभव पाटील एकत्रच; अफवा पसरवू नका’ : ब्रह्मानंद पडळकर Pudhari
सांगली

Brahmanand Padalkar | ‘आम्ही आणि वैभव पाटील एकत्रच; अफवा पसरवू नका’ : ब्रह्मानंद पडळकर

भारतीय जनता पक्ष सक्षमपणे काम करत आहे कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी केले

पुढारी वृत्तसेवा

विटा : आम्ही आणि वैभव पाटील एकत्रितपणे कार्यरत असून भारतीय जनता पक्ष म्हणून सक्षमपणे काम करत आहोत. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी केले. खानापूर मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने यांनी विटा तहसील कार्यालयासमोर बोगस कुणबी दाखल्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. जात पडताळणी समितीचे काही अधिकारी मनमानी करून बेकायदेशीर दाखले देत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर १५ दिवसांत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या एकदिवसीय आंदोलनाला माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, विपुल तारळेकर, बंडू कातुरे, विक्रम अवघडे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, विकास जाधव, मयूरेश गुळवणी आदींचा पाठींबा होता. दरम्यान, पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाच्या निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या गटांकडून वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या दोन गटांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांचे ब्रह्मानंद पडळकर यांनी खंडन केले.

ते म्हणाले, विटा शहरातील बैठक आणि ग्रामीण भागातील बैठक या दोन्ही वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालीच पार पडल्या. ग्रामीण भागातील बैठक आधीच गुड्डापूर येथे नियोजित होती. विटा शहर आणि ग्रामीण भाग ही स्वतंत्र मंडळे असल्याने बैठका वेगवेगळ्या झाल्या असून यात कोणताही गट-तट नाही. शासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याच्या आरोपांनाही त्यांनी फेटाळले. प्रशासन कोणत्याही दबावाखाली नसून ते सक्षमपणे काम करत आहे, याची प्रचिती लवकरच येईल, असे त्यांनी सांगितले.

खानापूर तालुक्यात भाजपची ताकद वाढत असून कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला असला तरी भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून खानापूर तालुका आणि विटा शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT