सह्याद्रीत व्याघ्र संवर्धनाला गती  Pudhari File Photo
सांगली

Sahyadri Tiger Reserve: सह्याद्रीत व्याघ्र संवर्धनाला गती

चांदोलीत सेनापतीच्या राज्यात चंदा, तर कोयनेतील ‌‘बाजी‌’च्या राज्यात ‌‘हिरकणी‌’चा प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

आष्पाक आत्तार

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारापाठोपाठ नुकतंच ‌‘हिरकणी‌’ वाघिणीचं आगमन झालं आहे. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र संवर्धनाला आणखी बळ मिळाले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातून -06 या वाघिणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वी स्थानांतरण केले आहे. पेंचमध्ये ‌‘लाडो‌’ या नावाने ओळखली जाणारी ही वाघीण आता सह्याद्रीत ‌‘हिरकणी‌’ नावाने ओळखली जात आहे.

चार ते पाच वर्षांची हिरकणी कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बोटीने तब्बल साडेचार किलोमीटरचा प्रवास करून हिरकणीला जंगलाच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या पद्धतीला ‌‘हार्ड रिलीज‌’ म्हणतात. या प्रक्रियेत स्थानांतरित प्राण्याला वेगळ्या विलगीकरण कक्षात न ठेवता थेट नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. यापूर्वी चंदा आणि तारा या दोन्ही वाघिणींना विलग्नवासात ठेवले होते. काही दिवसानंतर त्यांना सोडले.

पेंच व्याघ्र प्रकल्पात हिरकणीला यापूर्वी एकदा पिले झाली असून त्यामुळे ती पूर्णतः प्रजननक्षम आहे. गेल्या वर्षभरापासून कोयनेच्या खोऱ्यात अधिवास असलेल्या ‌‘बाजी‌’ या नर वाघाच्या हद्दीत तिला सोडल्याने हिरकणीच्या रूपाने बाजीला जोडीदार मिळणार आहे. बाजीने भैरवगड ते बाली-मालदीवपर्यंत हद्दक्षेत्र निश्चित केले आहे. साधारण पाच वर्षांचा असलेला बाजी आकाराने भक्कम असून त्याच्या पाऊलखुणांचा आकार 14 सेंटिमीटर, म्हणजेच माणसाच्या हाताच्या पंजाएवढा आहे. त्याची लांबी सुमारे आठ फूट, तर उंची तीन फूट असल्याने त्याच्या ताकदीचा अंदाज येतो.

व्याघ्रस्थानानंतरच्या प्रकल्पांतर्गत तीन वाघिणींना सह्याद्रीत आणले आहे. सह्याद्रीत यापूर्वी सेनापती, सुभेदार आणि बाजी यांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. आता सह्याद्रीत तीन नर आणि तीन मादी अशा सहा वाघांचा वावर आहे. ताडोबातून नुकत्याच सह्याद्रीत स्थानांतरित केलेल्या चंदा आणि तारा या वाघिणींनी चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर क्षेत्रात जम बसवला आहे. चंदासोबत सेनापती हा नर वावरत असून त्यांचे मीलन झाल्याचेही वन्यजीव विभागाने जाहीर केले आहे. दुसरीकडे तारा ही धरणापलीकडील वनक्षेत्रात अधिवास करते. त्यामुळे सुभेदार या वाघासंदर्भातही स्वतंत्र बातमी मिळेल, अशी आशा वन्यजीव विभागाने वर्तवली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी स्थानांतरण वाघ संवर्धनाच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT