शिराळा: शहरातील अत्यंत वर्दळीच्या कासार गल्लीत, एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या तब्बल ८ लाख ८८ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही धाडसी चोरी शुक्रवारी (दि.१) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिका सुजाता शामराव उथळे यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती सुजाता उथळे या शुक्रवारी सकाळी ८ वाजता आपल्या घराला कुलूप लावून रेड येथील शेताकडे गेल्या होत्या. जाताना त्यांनी घराची किल्ली घराबाहेरील फरशीखाली ठेवली होती. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. श्रीमती उथळे सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप काढलेले दिसले. घरात जाऊन पाहिले असता, घरातील तिजोरी आणि देवघरातील ड्रॉवर उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता, त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. चोरट्यांनी एकूण ८ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ज्यामध्ये ४ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या (किंमत: ₹२,४०,०००), सोन्याचे गंठण (किंमत: ₹१,८०,०००), २२ ग्रॅम सोन्याचा गोफ (किंमत: ₹१,३२,०००), १२ ग्रॅम सोन्याची माळ (किंमत: ₹७०,०००), १ तोळ्याची कर्णफुले (किंमत: ₹६०,०००), हिऱ्याची अंगठी (किंमत: ₹३७,०००), विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या, रिंगा आणि टॉप्स (एकूण किंमत: ₹८७,०००), चांदीचे निरांजन, ताट, करंडक आणि लक्ष्मीची नाणी (किंमत: ₹४०,०००), देवघरातील ड्रॉवरमधून चोरलेली रोख रक्कम (₹२२,०००) अशा वस्तूंचा समावेश आहे.
दिवसाढवळ्या आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.