कोकरूड : धसवाडी (ता. शिराळा) येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्या प्रफुल्ल रामचंद्र पाटील (वय 26, रा. शिराळे खुर्द, ता. शिराळा) या संशयिताला कोकरूड पोलिसांनी ताब्यात घेतले. कोकरूड पोलिस, शासकीय डॉक्टरांच्या संयुक्त पथकाने धसवाडी येथे सोमवारी रात्री ही कारवाई केली.
प्रफुल्ल याने सी.एम.एस व इ.डी. तसेच नॅचरोथेरपी व योगीक विज्ञान यातील डिप्लोमा व कम्युनिटी हेल्थ डिप्लोमा, असे शिक्षण घेतले आहे. त्याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्याकडील नोंदणी नाही. तरीही तो धसवाडी येथे दवाखाना चालवत असल्याच्या तक्रारी होत्या.
सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धसवाडी येथील त्याच्या दवाखान्यावर कोकरूड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयवंत जाधव, हवालदार रेखा सूर्यवंशी, कालिदास गावडे, शरद पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. युवराज जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आशुतोष शिंदे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी प्रफुल्ल याच्याकडे अॅलोपॅथिक औषधे आढळली. त्याच्याविरोधात कोकरूड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर कलम 33 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक उपनिरीक्षक कालिदास गावडे तपास करत आहेत.
कोणीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यवसाय करत आसल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्याला याची माहिती द्यावी.- गजानन जाधव, सहायक पोलिस निरीक्षक, कोकरूड