सांगली : महानगरपालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप व मदनभाऊ पाटील गटाच्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीतही पुन्हा उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भाजपचे नेते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. उर्वरित जागांवर ताकदीनुसार महायुतीच्या घटकपक्षांना तसेच अन्य पक्षांमधून भाजपमध्ये येणार्या ताकदवान कार्यकर्त्यांनाही भाजपची उमेदवारी दिली जाईल, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा व भाजप नेत्या जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व दिवाळी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक प्रमुख कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांच्याशी महापालिका निवडणुकीबाबत संवाद साधला. माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, प्रकाश मुळके, कांचन कांबळे, रोहिणी पाटील, शीतल लोंढे यांच्याकडून मंत्री पाटील यांनी प्रभागातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. पालकमंत्री पाटील यांनी मदनभाऊ पाटील गटातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली. पाटील यांनी प्रत्येक प्रभागातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले, महानगरपालिकेवर पुन्हा भाजप-महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी आतापासूनच कामाला लागा. जे मागच्या निवडणुकीत भाजप व मदनभाऊ पाटील गटातून विजयी झाले होते, त्या सर्वांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी कामाला लागावे. तसेच निवडणुकीपर्यंत जे कोणी अन्य पक्षातील माजी नगरसेवक भाजपमध्ये येतील, त्यांचाही विचार होईल. महायुतीच्या घटकपक्षांनाही उमेदवारी मिळेल. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मगदूम हे 2018 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मगदूम यांनाही भाजपची उमेदवारी पक्की असल्याचे स्पष्ट होत आहे.