Sangli ZP Pudhari
सांगली

Sangli ZP: जिल्हा परिषदेसाठी भाजपही आक्रमक

भाजप, शिवसेना, रयत क्रांती, जनसुराज्यचे सदस्य कोल्हापुरात : राष्ट्रवादीही संपर्कात असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भाजप, शिवसेना, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्ष असे एकूण 24 सदस्य सोमवारी रात्री कोल्हापुरात एकत्रित आले होते. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सदस्यही युतीच्या संपर्कात असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार, असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेला नवीन राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे. सत्तेच्या समीकरणात रंगत वाढली आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांची बैठक सोमवारी कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, महापौर धीरज सूर्यवंशी, सागर खोत, विलास काळेबाग, अनिल लोंढे उपस्थित होते. सत्तास्थापनेबाबत मतदान प्रक्रियेबाबत यावेळी सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत. सदस्यांना ‌‘सुरक्षित‌’ ठेवण्याची राजकीय रणनीती महायुती आणि महाविकास आघाडीने अवलंबली आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी पाठवण्यात आले आहे. भाजपनेही सोमवारी भाजपसह शिवसेना, रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्ष, असे एकूण 24 सदस्य कोल्हापुरात एकत्र आणले होते. त्यामुळे सत्तास्थापनेत सस्पेन्स निर्माण झाला आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. सुरुवातीला केवळ जेवणासाठी एकत्र बोलावण्यात आल्याचे सदस्यांना सांगण्यात आले होते, मात्र नंतर पुढील दोन दिवस सर्वांनी एकत्र राहण्याचा निर्णय कळविण्यात आला. त्यामुळे सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सदस्य फुटू नयेत, यासाठीच ही खबरदारी घेतल्याची माहिती नेत्यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. 61 सदस्य असलेल्या या ‌‘मिनी मंत्रालयात‌’ बहुमतासाठी 31 सदस्यांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीचे 30 सदस्य निवडून आले आहेत, तसेच महायुतीकडे 31 हे आवश्यक असणारे संख्याबळ आहे. मात्र सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही. शिंदे शिवसेनेचे सात, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सहा सदस्य सध्या जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळविण्यासाठी युती आणि आघाडीकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीने यापूर्वीच आपले सदस्य अज्ञातस्थळी पाठविले आहेत. सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत समझोता झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्ष पद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात येणार आहे. त्यानंतर सव्वा वर्षाने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

आघाडीबरोबरच महायुतीकडूनही सत्तास्थापनेसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचे सदस्य सोबत घेण्यात सध्या तरी भाजपला यश आले आहे. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सदस्यही संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अध्यक्ष निवडीवेळीच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

आघाडीच्या नेत्यांची आज बैठक

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड बुधवार, दि. 18 मार्चरोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांची आज, मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसह सभापती पदांचा फॉर्म्युला ठरणार आहे.

जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. कोल्हापुरात भाजप, शिवसेना, रयत क्रांती, जनसुराज्य पक्ष, अशा एकूण 25 सदस्यांना एकत्रित मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT