इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात येणार्या वाळवा तालुक्यातील 48 गावांत भाजपची ताकत वाढत चालल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्चस्व असलेल्या या गावांत सत्यजित देशमुख यांना 6 हजार 350 मताधिक्य मिळाले आहे. 48 पैकी 30 गावांत देशमुख यांनी, तर 18 गावांत मानसिंगराव नाईक यांनी आघाडी घेतली आहे.
शिराळा मतदारसंघाचे एकूण मतदान 3 लाख 7 हजार 12 आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील 48 गावांतील मतदान 1 लाख 55 हजार 851 आहे. ते शिराळा तालुक्यापेक्षा 4 हजार 690 जास्त आहे. या 48 गावांतील बहुतांश गावांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याच गटाचे वर्चस्व आहे. मात्र अलीकडच्या काळात येथे विरोधकांचीही ताकत वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना 30 गावांतून 8 हजार 874, तर महाविकास आघाडीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांना 18 गावांतून 2 हजार 524 असे मताधिक्य मिळाले आहे. देशमुख यांना येलूर, बहादूरवाडी, वाटेगाव, नेर्ले, इटकरे, कुरळप, ऐतवडे खुर्द, वाघवाडी, कामेरी, मरळनाथपूर या तर नाईक यांना कासेगाव, कुंडलवाडी, कणेगाव या गावांतून चांगले मताधिक्य मिळाले.
सत्यजित देशमुख यांना वाटेगाव (836), भाटवाडी (232), काळमवाडी (43), नेर्ले (568), कापूसखेड (133), पेठ (187), घबकवाडी (68), ओझर्डे (190), धुमाळवाडी (6), जांभूळवाडी (66), वाघवाडी (259), मरळनाथपूर (261), शिवपुरी (27), कामेरी (285), जक्राईवाडी (18), ढगेवाडी (182), कार्वे (175), इटकरे (409), शेखरवाडी (34), ऐतवडे बुद्रुक (39), लाडेगाव (11), वशी (130), येलूर (2088), कुरळप (445), मालेवाडी (197), तांदुळवाडी (172), ऐतवडे खुर्द (281), ठाणापुढे (150), चिकुर्डे (183), बहादूरवाडी (1199) या गावांतून मताधिक्य मिळाले आहे.
सत्यजित देशमुख यांच्या विजयासाठी 48 गावांतून आ. सदाभाऊ खोत, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, सी. बी. पाटील, डॉ. प्रताप पाटील, अशोक पाटील, नंदकुमार पाटील, अमोल पाटील, संजय घोरपडे, आनंदराव पाटील, डॉ. सचिन पाटील, राहुल पाटील, जयकर कदम, भोगराज घोरपडे आदी नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. महायुतीचे सर्व नेते एकजुटीने निवडणुकीला सामोरे गेल्याने तसेच लाडक्या बहिणींच्या साथीमुळे देशमुख यांचा विजय सुकर झाला.