Sangli Municipal Corporation Pudhari
सांगली

Sudhir Gadgil | भाजपची उमेदवारी दिलेल्यांना स्वीकृत पद नाही : आ. गाडगीळ

पद एक वर्ष की पाच वर्षे, हे नेत्यांच्या बैठकीत ठरेल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळालेल्यांना स्वीकृत नगरसेवक पद द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरले आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चांना अर्थ नाही. स्वीकृत नगरसेवक एक वर्ष द्यायचे, की पाच वर्षांसाठी, याबाबतचा निर्णय भाजपमधील सर्व नेत्यांच्या बैठकीत होईल, असे भाजपचे नेते आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. पक्षाने उमेदवार निश्चित केल्यानंतर उमेदवारी न मिळालेले अनेकजण नाराज झाले होते. त्यांची नेत्यांनी समजूत घातली होती. स्वीकृत नगरसेवक पद देऊ, अन्य ठिकाणी संधी देऊ, पक्षाचे काम नेटाने करा, असा शब्द नाराजांना दिला होता. आता पदाधिकारी निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक निवडीही होतील. दरम्यान, काही पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक करण्याच्या चर्चा भाजपच्या गोटात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्वीकृतसाठी इच्छुक असलेल्या अनेकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली, पण ते पराभूत झाले, त्यांना आता स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाऊ नये; संधी न मिळालेल्या निष्ठावंतांना स्वीकृत नगरसेवक पद द्यावे, अशी मागणी होत आहे.

त्यावर आमदार गाडगीळ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत ज्यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे, पण जे पराभूत झाले आहेत, त्यांना स्वीकृत नगरसेवक पद द्यायचे नाही, असे यापूर्वीच ठरलेले आहे. यावेळी स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 8 झाली आहे. भाजपच्या वाट्याला गेल्यावेळेपेक्षा एक जादा स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे. स्वीकृत नगरसेवक पद एक वर्षासाठी द्यायचे की पाच वर्षांसाठी, याबाबतचा निर्णय भाजप नेत्यांच्या बैठकीत होईल, असेही आमदार गाडगीळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT