वारणावती ः सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उखळू येथे गव्याच्या धडकेत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तुकाराम चंद्रु वडाम (वय 60) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम वडाम यांचे शेनवड नावाचे शेत असून तिथे त्यांनी मक्याचे पीक घेतले आहे. शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास ते पिकाची राखण करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या एका रानगव्याने अचानक पाठीमागून येऊन त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गव्याने त्यांना शिंगांच्या साहाय्याने उचलून जमिनीवर आपटले आणि तुडवले. यामध्ये वडाम यांच्या पायाला, मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. वडाम यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली, त्यानंतर गव्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.
जखमी तुकाराम वडाम यांना सुरुवातीला शित्तूर वारुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, पाठीच्या कण्याला लागलेली दुखापत गंभीर असल्याने, प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) हलवण्यात आले आहे.