नागज ः काशिलिंगाच्या नावानं... चांगभलं...! बिरोबाच्या नावानं चांगभलं...! च्या गजरात सनई-चौघडा, ढोल-कैताळाच्या निनादात आणि भंडार्याच्या उधळणीत आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील श्री बिरोबा देवाची यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यांच्या कानाकोपर्यातील सुमारे साडेतीन लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत, भक्तिमय वातावरणात, सलग तीन दिवस सुरू असलेला आरेवाडीच्या बिरोबा देवाच्या यात्रेचा महोत्सव शनिवारी प्रचंड उत्साहात संपन्न झाला.
शनिवारी (दि. 5) यात्रेचा मुख्य दिवस असल्याने शुक्रवारी रात्रभर भाविक मोटारसायकली, ट्रक, टेम्पो, जीप, ट्रॅक्टर, पिकअप, एस.टी. बसेस अशा मिळेल त्या वाहनाने बिरोबा बनात येत होते. त्यानंतर दुपारी तीन वाजल्यापासून बिरोबा बनातील गर्दीचा महापूर ओसरू लागला. सायंकाळी आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांचा पुन्हा चांगभलं..चा गजर आणि ढोल कैताळाचा निनाद पुन्हा आसमंतात दुमदुमला. त्यानंतर हजारो मैलांवरून आलेल्या भाविकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
यात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी यात्रेत भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला.
वाहनांच्या गर्दीमुळे नागजफाटा तसेच नागज-ढालगाव रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती. यात्रेत चोरी करणार्या 15 चोरट्यांना पकडण्यात आले. लहान मुले गर्दीत चुकण्याचे प्रकारही घडले. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याच्या पंधरा टँकरची व्यवस्था केली होती. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोळेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस आरोग्य कर्मचारी कार्यरत होते. यात्रा काळातील तीन दिवसात दीड हजारांवर भाविक रुग्णांवर उपचार करण्यात आले.
भाविकांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या सांगली विभागाच्या वतीने वाहतूक निरीक्षक संतोष सन्नके यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा बनात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. सांगली विभागाच्या 50 एस.टी.बसेस प्रवाशांची ने-आण करत होत्या. महिलांना प्रवास भाड्यात 50 टके सवलत व ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बस असल्याने या प्रवाशांचा एस.टी.ने प्रवास करण्याकडे कल दिसून आला.
मंदिराच्या परिसरात गजनृत्य, धनगरी ओव्या व हेडंब आदी कार्यक्रमांनी भाविकांची करमणूक केली. मंदिर परिसरात नारळ, मेवा-मिठाई, शीतपेये, खेळणी, बांगड्या, कासरे-कंडे व बैलांना सजवण्याचे साहित्य, घोंगडी, भांडी, शेतीची अवजारे आदी स्टॉल्सवर भाविकांची गर्दी दिसत होती.
सोलापूर, पंढरपूर, सांगली भागातून बकर्यांच्या कातडीचे व्यापारी आले होते. बकर्यांच्या कातडीचा दर शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत होता. घोंगड्याचा दर पाचशे रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत होता.
यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष जयसिंगराव शेंडगे, अध्यक्ष काशिलिंग कोळेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ कोळेकर, सचिव राहुल कोळेकर, खजिनदार विठ्ठल कोळेकर, माजी पोलिस पाटील रामचंद्र पाटील, रावसाहेब कोळेकर, रमेश कोळेकर, बाळासाहेब कोळेकर, भरमू कोळेकर, समाधान कोळेकर यांच्यासह विश्वस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.