Bird Museum
पक्षी संग्रहालय Pudhari News Network
सांगली

सांगली : प्रतापसिंह उद्यानात साकारतेय पक्षी संग्रहालय

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिकेच्या प्रतापसिंह उद्यानात पक्षिसंग्रहालय साकारत आहे. पहिल्या टप्प्यातील उभारणीचे काम 60 टक्के झाले आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाचा कार्यारंभ आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी झाल्यास जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर पक्षिसंग्रहालयाचे लोकार्पण होईल.

प्रतापसिंह उद्यान 2.16 कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालय होत आहे. पहिल्या टप्प्यात 1.16 कोटी रुपये मंजूर झाले होते. नुकतेच उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांनी महापालिका क्षेत्रातील 50 कोटींच्या कामांचा सुधारित आदेश जारी केला आहे. त्यात पक्षिसंग्रहालयाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामांसाठी 1 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे कामाच्या पूर्णत्वातील आर्थिक अडचण दूर झाली आहे.

पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या 1.16 कोटींमधून प्रस्तावित केलेली कामे सुरू आहेत. पक्षांसाठी नवीन पिंजरे, जाळी, बेड काँक्रिट, शेड, पाथ वे स्टॅम्प काँक्रिट, पक्षांची घरटी, पाणी, खाद्य साठवायचे भांडार, पक्षांची माहिती देणारे फलक, लॉन, बगिचा आदी कामांचा समावेश आहे. त्यातील 60 टक्के काम झाले आहे. गटार, शेडचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे सुरू आहेत. दुसर्‍या टप्प्यात 1 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पक्षिसंग्रहालयाच्या उर्वरित कामांसाठी 60 लाख रुपये आणि पक्षी खरेदीसाठी 40 लाख रुपयांची तरतूद केली आहे. दुसर्‍या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी निघाल्यास जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत सर्व काम पूर्ण होईल. सांगलीकरांसाठी हे पक्षिसंग्रहालय पाहण्यास खुले होईल.

SCROLL FOR NEXT