विटा : डंपरने धडक दिल्याने दुचाकीस्वार महादेव आनंदा शिंदे (वय 60, नागेवाडी, ता. खानापूर) हे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी विटा येथे विटा - मायणी रस्त्यावर झाला. अजय संजय माने (हणमंतनगर, विटा) यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.
महादेव शिंदे हे नागेवाडी येथे पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून नोकरीस होते. ते दुचाकी (एम. एच. 10, ई. सी. 8297 ) वरून नागेवाडी येथून टपाल आणण्यासाठी विट्याकडे येत होते. विटा येथे मायणी रस्त्यालगत एका किराणा स्टोअर्ससमोर ते आले असता मागून येणाऱ्या डंपरने (एम. एच. 11, बी. एल. 5790) त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्या धडकेत शिंदे यांच्या डोके व हाताला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पण तत्पूर्वीच शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डंपर चालक रामचंद्र सिद्धनाथ धाबे (गार्डी, ता. खानापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, डंपर सूरज कदम (घुमटमाळ, विटा) यांच्या मालकीचा असून डंपरचालक रामचंद्र धाबे याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक जयश्री कांबळे तपास करत आहेत.