कोकरूड : कराड-रत्नागिरी राज्यमार्गावर सय्यदवाडी-येळापूर (ता. शिराळा) येथे मोटार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार इकबाल उस्मान खान (वय 50, मूळ रा. झारखंड, सध्या रा. मुजावर कॉलनी, कराड) यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवार, दि. 14 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इकबाल खान हे दुचाकीवरून खारी, टोस्ट, बटर विक्रीचा व्यवसाय करीत असत. ते दररोज सकाळी कराडहून शेडगेवाडी भागात गावोगावी फिरत असत. शनिवारीही ते बटर, टोस्ट विक्री करून दुचाकीवरून (क्र. एमएच 50 एफ 6812) परत कराडच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी प्रशांत संभाजी पाटील (वय 48, रा. बिऊर, ता. शिराळा) हे आपली मोटार (क्र. एमएच 10 ईई 2003) घेऊन कराडहून शेडगेवाडीच्या दिशेने निघाले होते.
येळापूरपैकी सय्यदवाडी येथील हॉटेल ओंकारसमोर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात वर्मी मार लागल्याने इकबाल खान यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी कोकरूड पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.