तासगाव : महाराष्ट्राच्या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून 2024 मध्ये विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते रोहित आर. आर. पाटील यांनी देशातील सर्वात तरुण आमदार म्हणून राजकीय क्षेत्रात नवीन ओळख निर्माण केली. परंतु मात्र हा मान बिहार राज्याच्या अलीनगर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर यांनी आपल्या नावावर नोेंदवला आहे. बिहारच्या नुकत्याच घोषित झालेल्या निकालांनंतर देशातील सर्वात तरुण आमदार हा किताब अधिकृतरीत्या त्यांच्या नावावर झाला आहे. 25 वर्षे 3 महिने 20 व्या दिवशी त्या आमदार झालेल्या आहेत.
4 जुलै 1999 रोजी जन्मलेल्या रोहित पाटील यांनी 2024 साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. आमदार म्हणून निवडून आले त्या दिवशी त्यांचे वय 25 वर्षे 4 महिने 19 दिवस होते. राजकारणात तरुणाईची एक नवी दिशा दाखवत रोहित केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्य स्तरावरही भक्कम छाप पाडली. रोहित पाटील वयाच्या 9 हजार 274 व्या दिवशी आमदार झाले होते. आजच्या राजकीय युगात इतक्या कमी वयात लोकप्रतिनिधी बनणे हे एक प्रेरणादायी यश ठरले.
बिहारमध्ये झालेल्या सध्याच्या विधानसभा निवडणुकीत अलीनगर येथील मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या मैथिली ठाकूर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना विजयी केले. निकाल जाहीर होताच एक नवा इतिहास घडला. 25 जुलै 2000 रोजी जन्मलेल्या मैथिली ठाकूर विजयी झाल्या त्या दिवशी त्यांचे वय 25 वर्षे 3 महिने 20 दिवस आहे. म्हणजेच त्या रोहित पाटील यांच्या तुलनेत 31 दिवसांनी कमी वयात आमदार बनल्या. दिवसांच्या हिशेबाने पाहता, त्या 9 हजार 243 व्या दिवशी आमदार झाल्या आहेत.
देशातील सर्वात तरुण आमदारपदाचा मान बदलला असला तरी महाराष्ट्रात रोहित पाटील आणि बिहारमधील मैथिली ठाकूर ही नावे आता राष्ट्रीय राजकारणात नव्या ऊर्जेचे आणि नव्या नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पाहिली जात आहेत. तरुणाईने राजकारणात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, नवे दृष्टिकोन आणावेत, यासाठी ही दोन्ही नावे प्रेरणा देणारी ठरत आहेत. संपूर्ण घडामोडीनंतर देशातील तरुण राजकारण्यांमध्ये आरोग्यपूर्ण स्पर्धेला नवा आयाम मिळाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये रोहित पाटील यांच्या तरुणाईने आशादायी दिशा दिली आहे. आता बिहारमध्ये मैथिली ठाकूर यांच्या निवडीने हा प्रवाह अधिक बळकट होताना दिसणार आहे.