सांगली : गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भिलवडी पोलिस ठाण्यातील हवालदार संतोष गोविंदराव बेंबडे (वय 47, रा. कवठेमहांकाळ) याला रंगेहात पकडण्यात आले. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध भिलवडी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार संतोष बेंबडे यांच्याकडे होता. या प्रकरणात संशयितांना पोलिस कोठडी न मिळता न्यायालयीन कोठडी मिळावी, यासाठी मदत करण्याच्या बदल्यात बेंबडे यांनी सुरुवातीला 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने या मागणीबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये, बेंबडे यांनी तडजोडीअंती 8 हजार रुपये मागितले आणि त्यापैकी 5 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास भिलवडी ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असलेल्या रेस्ट रूममध्ये, 5 हजार रुपये स्वीकारताना पंचांच्या उपस्थितीत एसीबीच्या पथकाने बेंबडे यांना रंगेहात पकडले.
त्यांच्याकडून लाचेची रक्कम, मोबाईल फोन आणि शासकीय ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.