आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या कार्यकाळात करण्यात आलेली सर्व टेंडर प्रकिया वादग्रस्त आहेत. या प्रक्रियेची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मुख्याधिकारी हजारे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी भारत पाटील म्हणाले की, नगरपंचायतीचा सुरू असलेला अनागोंदी कारभार आम्ही खपवून घेणार नाही. कोणाच्या तरी हातचे बाहुले असल्यासारखा कारभार चालू देणार नाही. टेंडर प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
रात्री दहा वाजता मुख्याधिकारी हजारे यांच्या कारभाराची, मॅनेज होणाऱ्या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. या आठवड्यातील सुट्ट्या लक्षात घेऊन टेंडर प्रक्रिया राबवली गेली आहे. अन्य ठेकेदारांना वाव मिळू नये आणि मर्जीतील ठेकेदारांना टेंडर देता यावे, म्हणून हा खटाटोप सुरु आहे. या प्रक्रियेची मुदत वाढवावी आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.