सांगली : विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भालचंद्र वीरेंद्र पाटील यांची दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी प्रचंड बहुमताने फेरनिवड झाली. सांगली येथे मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत उपस्थित 72 पैकी 68 सदस्यांनी एकमुखी, हात उंचावून या निर्णयाला मान्यता दिली. दरम्यान, सभा सुरू झाल्यानंतर प्रकाश आवाडे गटाचे काही लोक अचानक सभेच्या ठिकाणी घुसले. त्यांनी सभा उधळून लावायचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार वादावादी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद आटोक्यात आणला.
मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये सूचक म्हणून कर्नाटक विभागाचे आश्रयदाता ट्रस्टी अभिनंदन रावसाहेब पाटील यांनी भालचंद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. त्याला सभेचे खजिनदार संजय शेटे यांनी अनुमोदन दिले. यावेळी मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत सभासदांनी एकमताने हात उंचावून या निर्णयाला संमती दिली. 2025 ते 2028 या कालावधीसाठी पाटील यांची निवड झाली. आवाडेसमर्थक डी. ए. पाटील यांच्या बाजूने चार मते पडली. जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या या निवडीसाठी राज्यभरातील सर्व शाखांमधील चेअरमन, सचिव मतदानासाठी उपस्थित होते. बोर्डिंगच्या सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आवाडे गटाचे काही लोक सभेच्या ठिकाणी अचानक घुसले. त्यांनी जबरदस्तीने सभा उधळून लावायचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार वादावादी झाली.
सभेत एकमेकांच्या अंगावर धावून जायचा प्रयत्न झाला. काहीजणांचे कपडे फाडले. खुर्च्या घेऊन अंगावर धावून जायचा प्रकारही घडला. उपस्थितांतील मान्यवरांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी वेळीच सभेच्या ठिकाणी धाव घेत दंगा घालणार्यांना पांगवले आणि वादावादी आटोक्यात आणली. दक्षिण भारत जैन सभेच्या निवडीवेळी अशी वादावादी झाल्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.